Maharashtra | .... अन्यथा दहावी-बारावी परीक्षेच्या कामावर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 09:29 AM2023-02-16T09:29:53+5:302023-02-16T09:31:19+5:30
मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला फेब्रुवारी अखेरपर्यंतचा वेळ दिला आहे...
पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने विविध मागण्यांसाठी नुकतेच शिक्षण आयुक्त कार्यालयावर महाआक्राेश मोर्चाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला फेब्रुवारी अखेरपर्यंतचा वेळ दिला आहे. ताेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या २ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावी, तसेच सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी राज्य मंडळ व शिक्षकेतर महामंडळाचे पदाधिकारी यांची संयुक्त सहविचार सभा शुक्रवारी आयोजित केली आहे. त्यामध्ये आम्ही आमच्या मागण्या मांडणार आहोत, तसेच फेब्रुवारी महिना संपेपर्यंत त्या मान्य झाल्या नाही, तर शिक्षकेतर कर्मचारी मार्च महिन्यापासून दहावी-बारावी परीक्षांचे कामकाज करणार नाहीत. त्यामुळे परीक्षेत अडचणी आल्यास त्याची सर्व जबाबदारी राज्य शासनाची राहील असे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी सांगितले. सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असून, २१ पासून बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने प्रात्यक्षिक परीक्षेला काेणताही अडथळा या माेर्चाचा असणार नाही.