...अन्यथा आगीत आणखी होरपळले असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:12 AM2021-01-23T04:12:13+5:302021-01-23T04:12:13+5:30
पुणे : सिरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी (दि. २२) लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्या वेळी जेवणाची सुट्टी ...
पुणे : सिरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी (दि. २२) लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्या वेळी जेवणाची सुट्टी झाली होती. त्यामुळे बहुतांश कामगार इमारतीबाहेर पडले होते. जेवण झाल्यानंतर जे कामगार वरच्या मजल्यावर गेले, तेच प्रामुख्याने या आगीच्या कचाट्यात सापडले. आग थोडी उशिरा किंवा आधी लागली असती तर आगीमुळे जखमी अथवा मृत होणाऱ्यांची संख्या वाढली असती, अशी भीती तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पोलिसांकडून या आगीच्या वेळी तेथे कामावर असलेल्या कामगारांचे जबाब घेण्याचे काम सुरु आहे. त्यात आग पाहिल्याचे सांगणारे अजून कोणीही पुढे आलेले नाही. अनेकांनी जबाब देताना ‘आग’ ‘आग’ असा आरडाओरडा ऐकल्याने आम्ही आग लागल्याचे पाहून हातातील कामे टाकून बाहेर पळाल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्ष आग लागल्याचे आपण पाहिले, असे सांगणारे आतापर्यंत कोणीही पुढे आले नाही.
चौकट
८-१० ठेकेदारांचे काम
या ठिकाणी एकाच वेळी ८ ते १० ठेकेदारांचे कामगार काम करीत होते. त्यात काही इलेक्ट्रिक, काही फर्निचरचे काम करत होते. काही जण वातानुलुकीत यंत्रणेचे काम करत होते. छताचे पीओपी करणारे काही कामगार होते. तेथेच वेल्डिंगचे कामही सुरु होते. त्यामुळे आग नेमकी कोणाच्या चुकीमुळे लागली, याचा तपास करणे किचकट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
चौकट
अंत्यसंस्कार गावाकडे
या आगीत मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २२) पहाटे नातेवाईकांच्या ताब्यात पार्थिव देण्यात आले. प्रतीक पाष्टे याच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र इंगळे हे इलेक्ट्रिक इंजिनिअर होते. त्यांचा भाऊ संदीप इंगळे धायरीत राहात होते. महेंद्र यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव अकोला तालुक्यातील चांदूरगावला नेण्यात आले. उमा शंकर हरिजन हे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील असून बिपिन सरोज हेही प्रतापगड जिल्ह्यातील आहेत. दोघांचे मृतदेह गावी नेण्यात आले. सुशीलकुमार पांडे यांचे पार्थिव बिहारमधील पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील जोगिया गावी रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.