...अन्यथा पीएमपीची बससेवा बंद करावी लागेल; इंंधन, वेतनासाठीही नाहीत पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 11:48 AM2020-09-26T11:48:06+5:302020-09-26T11:58:20+5:30
सुमारे ९० कोटी रुपये पीएमपीला मिळणे अपेक्षित असताना एक दमडीही मिळालेली नाही...
पुणे : प्रवाशांअभावी तोट्यात सुरू असलेली पीएमपी बससेवा पैशांअभावी बंद पडण्याची वेळ आली आहे. दोन्ही महापालिकांनी हात आखडा घेतल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, आरोग्य योजना तसेच इंधनासाठीही पैसे नाहीत. सुमारे ९० कोटी रुपये पीएमपीला मिळणे अपेक्षित असताना एक दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे दोन्ही पालिकांनी त्यांच्या हिश्श्याचे पैसे लवकर द्यावेत, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुले पीएमपीचा आर्थिक डोलारा पुर्णपणे कोसळला आहे. दि. ३ सप्टेंबरला बससेवा सुरू झाली असली तरी अपेक्षित प्रवासी नसल्याने उत्पन्न मिळत नाही. त्यातच दोन्ही महापालिकांकडून आर्थिक मदत होताना दिसत नाही. लॉकडाऊन काळात दोन्ही पालिकांनी विविध सेवांसाठी पीएमपीचे कर्मचारी तसेच बस घेतल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही बस घेण्यात आल्या आहेत. पण त्यापोटीचे जवळपास ४८ कोटी रुपयांपैकी एक पैसाही पीएमपीला देण्यात आलेला नाही. ही रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. पुणे महापालिकेकडून सुमारे ३५ कोटी तर पिंपरी चिंचवड पालिकेकडून सुमारे १३ कोटी ४० लाख रुपये मिळालेले नाहीत.
दोन्ही महापालिकांना कोरोनाशी संबंधित विविध कामांसाठी पीएमपीकडून सुमारे तीन हजार कर्मचारी देण्यात आले आहेत. तसेच ऑगस्टपर्यंतच्या पाच महिन्यांत १४ हजार बस उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतही सुमारे साडे सहा हजार बस देण्यात आल्या आहेत. या बसचे भाडे तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी दोन्ही पालिकांकडून पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे पीएमपीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या मार्गावर केवळ २५ टक्के बस असल्या तरी प्रवाशांची संख्या एक ते सव्वा लाखांच्या जवळपास असून त्यातून सुमारे १८ ते २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष दैनंदिन खर्चाच्या तुलनेत हे उत्पन्न अत्यंत अल्प आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांकडून पैसे मिळाल्याशिवाय आता बससेवा तग धरू शकणार नाही, हे स्पष्ट आहे.
-------------
दोन्ही महापालिकांना कोविड काळात बस आणि कर्मचारी देण्यात आले. त्यापोटी एकही पैसा मिळालेला नाही. त्यामुळे बस चालविणे कठीण झाले आहे. इंधन, वेतन तसेच आरोग्य योजनांसाठी पैसे नाहीत. सुमारे ९० कोटी रुपयांचे देणे आहे. रोख पैशांशिवाय डिझेल मिळत नाही. एमएनजीएल कंपनीने सीएनजीचे ४० कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास गॅसपुरवठा थांबविण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बस सेवा थांबवावी लागु शकते. दोन्ही महापालिकांनी लवकर पैसे द्यावे.
- राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
------------------------------
दोन्ही महापालिकांकडून येणे
पुणे पिंपरी चिंचवड
अत्यावश्यक सेवेसाठी दिलेल्या बस- १०,९६७ ३,०६४
कर्मचारी- १,९३७ १,११३
बस भाडे ११,३३,३६,००० २,४५,१२,०००
वेतन २०,८३,२८,७०४ ८,८२,७०,७०९
जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या बस ६,४५४ ६,४५४
भाडे ३,१८,९६,००० २,१२,६४,०००
एकुण रक्कम ३५,३५,६०,७०४ १३,४०,४६,७०९
----------------------------------------------------------------------
--