...अन्यथा पुरंदर किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात
By Admin | Published: May 15, 2014 05:23 AM2014-05-15T05:23:32+5:302014-05-15T05:23:32+5:30
किल्ल्यावर झालेली पडझड पाहवत नाही. पुरंदर किल्ला संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे.
नारायणपूर : किल्ल्यावर झालेली पडझड पाहवत नाही. पुरंदर किल्ला संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे किल्ल्याचे किल्लेपण जतन करण्याचे काम त्यांनी करावे. या ठिकाणी सर्व सुविधा द्याव्यात, पर्यटकांची अडवणूक त्वरित थांबवावी. आगामी काळात किल्ल्यावरील डागडुजी, रस्ते सुधारले नाही तर आम्हाला हा किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी देऊन नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर संपूर्ण स्वराज्याची धुरा सांभाळणार्या, एकाच वेळी आदिलशाही, मुघल, इंग्रज, फ्रेंच, आणि काही प्रमाणात स्वकियांशी सतत १० वर्षे अविरत झुंज देऊन स्वराज्याचे रक्षण करणार्या छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ला (ता. पुरंदर) येथे जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज, अशोक टेकवडे, विजय कोलते, सुदाम इंगळे, सुजाता दगडे, माणिक झेंडे, डॉ. स्मिता पाटील, सारिका इंगळे, गौरी कुंजीर, अनिता कुदळे, अंजना भोर, ज्योती परिहार, प्रशांत पाटणे, मराठा राजाभाऊ जगताप, रामभाऊ बोरकर उपस्थित होते. सकाळी पुरंदर किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास जलाभिषेक करुन पुष्पहार अर्पण करण्यांत आला. त्यानंतर पंचायत समितीच्या वतीने विविध कार्यक्रम केले. येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्माचा पाळणा म्हणण्यात आला. पुरंदर प्रतिष्टानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती किल्ले पुरंदरवर त्यांच्या जन्मस्थानी सकाळी पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूणाकृती पुतळ्यास जलाभिषेक करुन पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर भव्य मिरवणूक, भंडारा, आणि दिवसभर विविध कार्यक्रम झाले. या ठिकाणी हजारो भक्त उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हातून विविध मान्यवर उपस्थित राहिले होते. पुरंदर प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, ग्रामसेवक संघटना पुरंदर, पंचायत समिती पुरंदर, विविध ठिकाणाहून आलेल्या मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी केली. (वार्ताहर)