अन्यथा साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 02:48 PM2018-06-30T14:48:24+5:302018-06-30T14:57:18+5:30
सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत आम्ही संयम ठेवला आहे. यापूढे शेतकऱ्यांची लुट होवू देणार नाही....
पुणे: ज्या सर्वसामान्य शेतक-यांच्या मतांवर आताचे सरकार निवडून आले आहे त्यांना गरीब शेतक-यांचा विसर पडला. आगामी काळात शेतक-यांची ताकद सरकारला दाखविल्याशिवाय राहणार नाही,असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. सरकारने उसाची एफआरपीची थकित रक्कम त्वरीत द्यावी. तसेच गायीच्या दुधाला प्रतिलीटर ५ रुपयांचे थेट अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात ही रक्कम जमा करावी. अन्यथा २१ जुलैनंतर एकाही साखर कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
ऊसउत्पादक आणि दूधउत्पादक शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी टिळक चौक ते साखर संकुल दरम्यान मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत आम्ही संयम ठेवला आहे. यापूढे शेतकऱ्यांची लुट होवू देणार नाही. १५०० कोटी रुपयांची उसाची एफआरपी थकीत येणे बाकी आहे. व्याजाची रक्कम शेतकऱ्यांनी का द्यावी? एफआरपीची रक्कम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्यांकडे तब्बल ६० कोटी थकीत रक्कम आहे.
दरोडेखोरांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या असल्याचा घणाघात करत३० जुलै पर्यंत थकीत रक्कम देण्यात यावी अन्यथा मंत्र्यांच्या घरावर जप्ती आणावी लागेल असा इशारा खासदार शेट्टी यांनी यावेळी दिला. गेल्या वर्षी उस तोडणी व वाहतुकीच्या दरात घोळ केला आहे. उस दर नियंत्रण समितीने घेतलेल्या निर्णयात कोणताही बदल करु नये.काही साखर कारखान्यांच्या संचालकांनी गरीबांचा उस कमी दराने खरेदी केला व तोच उस पाहुण्यांच्या नावाने कारखान्यांना जादा दराने दिला,असा आरोपही खासदार शेट्टी यांनी केला. ते म्हणाले, ‘‘ यावेळी आम्ही संयम ठेवला आहे.यापुढे शेतकऱ्यांची लूट होऊ देणार नाही.१५०० कोटी रुपयांची उसाची एफआरपी येणे आहे.शेतकऱ्यांचा दोष नसताना त्रास का ? व्याजाची रक्कम शेतकऱ्यांनी का द्यावी? एफआरपीची रक्कम देण्याची जबाबदारी सरकारची आहे.
यावेळी रविकांत तुपकर,प्रकाश पोफळे,राजेंद्र ढवाण पाटील,भगवान काटे,सुरेश पाटील,सावकार मादनाईक,जालींदर पाटील,रसीका ढगे आदी उपस्थित होते.