...अन्यथा पुढील दहा दिवसांत पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक राहणार नाही! डॉ.संजय ललवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 09:05 PM2021-03-19T21:05:30+5:302021-03-19T21:34:29+5:30
४५ वर्षांच्या पुढच्या सर्व लोकांचे सरसकट लसीकरण करणे आवश्यक
पुण्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ८०% रुग्ण हे गृहविलगीकरणात असल्याने काळजीचे कारण नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही परिस्थिती पुढच्या १० दिवसांत आणखी वाईट होणार असल्याचे मत भारती हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक तसेच संसर्गजन्य आजारांचे तज्ञ डॉ. संजय ललवाणी यांनी व्यक्त केले आहे.
पुढच्या दहा दिवसांमधे पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक नसण्याची परिस्थिती येऊ शकते असेही ते म्हणाले. लसीकरणामुळे कोरोना होणार नाही अशी शाश्वती नसली तरी देखील लसीमुळे कोरोना सौम्यच होतो, रुग्णाला गंभीर लक्षणे जाणवत नाहीत आणि तो मृत्यूच्या दारात जाण्याची परिस्थिती निर्माण होत नाही, असेही ललवाणी म्हणाले. ४५ वर्षांच्या पुढच्या सर्व लोकांचे सरसकट लसीकरण करणे आवश्यक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 'लोकमत'ने ललवाणी यांच्याशी संवाद साधला.
वर्षभरापूर्वीची परिस्थिती आणि आत्तामध्ये नेमका काय फरक आहे याबाबत बोलताना ललवाणी म्हणाले “ जेव्हा कोरोनाला सुरुवात झाली तेव्हा नेमके कसे उपचार करायचे याची माहिती नव्हती. आता उपचारांची माहिती आहे. पण असे असले तरी आत्ताही लक्षणांवरच उपचार केले जात आहेत. कोरोनावर कोणतेही औषध अद्याप सापडलेले नाही.पण या व्यतिरिक्त कोणताही फरक नाहीये. कोरोना मध्ये झालेल्या म्युटेशन्स नंतर देखील कोरोना तितकाच गंभीर आहे जसा सुरुवातीला होता.”
''सुरुवातीला लॅाकडाउन होता. तेव्हा गरीब माणसे आर्थिक अडचणींमुळे बाहेर पडली. त्यांच्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. आत्ता मात्र लॅाकडाउन नसल्याने लोक पार्टी तसेच इतर कारणाने भेटत आहेत. त्यामुळे आत्ताचा प्रसार हा मध्यम आणि उच्चमध्यमवर्गात पाहायला मिळत आहे.”असेही ललवाणी यांनी यावेळी सांगितले.
ही परिस्थिती आणखी बिकट होत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. “ आत्ता गंभीर रुग्ण नसल्याने काळजीचे कारण नसल्याचे सांगितले जात आहे. पण तशी परिस्थिती नाही. पुढच्या १० दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांच्या आसपास पोहोचेल. तसेच त्यात गंभीर रुग्णांचे प्रमाणाही असेल. १० दिवसांनंतर पुन्हा रुग्णालयातील बेड फुल झालेले असतील. बेड मिळत नाही अशी परिस्थिती येईल. सध्या लॅाकडाउन नसल्याने आणि लोक नियम पाळत नसल्याने ही संख्या वाढते आहे. मात्र लॅाकडाउन हा पर्याय नाही. तर लोकांनी नियम पाळणे आवश्यक आहे.”
याच पार्श्वभुमीवर लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यक्ता देखील त्यांनी व्यक्त केली. “ कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असे नाही. लस घेवुनही कोरोना होऊ शकतो. मात्र त्याची तीव्रता कमी असते. आत्ता आमच्या रुग्णालयात गंभीर असणाऱ्या रुग्णांपैकी फक्त एकानेच लसीचा एक डोस घेतला आहे. जर लसीकरण झाले तर रुग्ण गंभीर होणार नाही- लस डेथ प्रिव्हेंशन करते. सरकारने ४५ वर्षांवरच्या सगळ्याच नागरिकांचे सरसकट लसीकरण करणे आवश्यक आहे”
दरम्यान, आत्ता दुसरी लाट असून ३ महिन्यांनी शाळा सुरु झाल्यानंतर लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार होउन तिसरी लाट येऊ शकते, असेही ललवाणी यांनी सांगितले. त्यामुळेच भीती न बाळगता जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे असेही ते म्हणाले.