...अन्यथा पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा लावू; पुणे पोलिसांना मनसेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 04:11 PM2022-05-06T16:11:08+5:302022-05-06T16:11:28+5:30
पुणे शहरात साधारणपणे ४०० ते ४५० मशिदी अस्तित्वात आहेत
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेनंतर संपूर्ण राज्यच कामाला लागले आहे. त्यांचा ३ तारखेचा अल्टिमेटम त्यानंतर ४ तारखेचे आंदोलन याचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांनी जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाआरती, मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणे, अशी आंदोलने कार्यकर्त्यांनी सुरु ठेवली आहेत. पुण्यातून मनसेने पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. आमच्या मागण्याचा विचार करून पोलिसांनी मौलवीच्या मध्यस्थीने ग्वाही द्यावी, अन्यथा आम्हाला पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा म्हणावी लागेल. असा इशारा मनसेने पुणे पोलिसांना दिला आहे.
राजसाहेबांनी घेतलेली भूमिका व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यावरून मशिदींवरील भोंग्यांबाबत जे आंदोलन सुरु झाले आहे, ते पुढे चालूच राहील अशी भूमिका राजसाहेबांनी घेतली आहे व या भूमिकेस संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे शहर व जिल्हा बांधील आहे. भोंगा हा सामाजिक विषय आहे व आम्हालाही धार्मिक तेढ निर्माण करावयाची हौस नाही. परंतु आम्ही आमच्या भूमिकेपासून फारकत घेऊ शकत नाही व त्यामुळेच या निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याकडे मागणी करते की, संपूर्ण पुणे शहरात साधारणपणे ४०० ते ४५० मशिदी अस्तित्वात आहेत. जवळपास सर्वच मशिर्दीवरील भोंगे अनाधिकृत आहेत. ते भोंगे उतरवावेत अथवा ते कायम स्वरूपी बंद अवस्थेत ठेवावेत. जेणेकरुन यावरुन मोठ्या आवाजात बाहेर पडणाऱ्या अजानचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना होणार नाही. अजानला आमचा विरोध नाही परंतु ती भोंग्याद्वारे करावयाची नाही यावर आम्ही ठाम आहोत. तसेच या सर्व मशिदींचे जे मौलवी आहेत त्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीसांच्याच मध्यस्थीने आम्हाला पोलीसांमार्फत लेखी स्वरुपात ग्वाही देऊन कळवावे की आमच्या मशिदीवरून भोंग्याद्वारे अजान केली जाणार नाही. या पद्धतीने ग्वाही मिळाल्यास धार्मिक अथवा सामाजिक तेढ निर्माण होण्याचा प्रश्न उरणार नाही व आमच्यासह ते सुध्दा कायद्याला बांधील राहतील असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तर या मागणीचा तत्काळ विचार करुन मौलवींकडून पोलीसांच्या मध्यस्थीने अशा स्वरुपाची ग्वाही देण्यात यावी अन्यथा आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून आम्हाला आपल्या पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा म्हणावी लागेल असं इशारा त्यांनी दिला आहे.