PM Modi Pune Visit: अन्यथा आंदोलनाला आंदोलनाचे उत्तर देऊ; विरोधकांना भाजपचा इशारा
By निलेश राऊत | Published: July 31, 2023 03:53 PM2023-07-31T15:53:27+5:302023-07-31T15:53:45+5:30
विरोधकांकडून होणारे मोदी यांच्या विरोधात केले जाणारे आंदोलन म्हणजे, पुणेकरांसाठी आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा
पुणे : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने दौरा अंत्यत महत्वाचा आहे. पण शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काँग्रेसकडून केवळ मोदींबद्दल वैयक्तिक आकस असल्याने त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. ही आंदोलने पोलिसांकडून थांबविण्यात यावीत, अन्यथा भाजपकडून या आंदोलनाला आंदोलनाचे उत्तर दिले जाईल. असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर मुरधीलर मोहोळ यांनी दिला आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, विरोधकांकडून केले जाणारी ही आंदोलने दुटप्पी व नोटंकी असलेली आंदोलने आहेत. एककीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे. तरीही या पक्षाकडून आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेस कुटुंब असलेल्या टिळक घराण्याकडून जो पुरस्कार दिला जात आहे, त्याला काँग्रेस विरोध करीत आहे. केवळ मोदी व्देषाने पझाडलेली व आजारी माणसे ही आंदोलने करू पाहत आहेत. पण १ ॲागस्ट रोजी मोदी पुणे दौऱ्यावर असताना जेथे कोठे विरोधकांकडून आंदोलन केले जाईल, तेथे भाजप त्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा अथवा होणारे विविध कार्यक्रम हे काही कुठल्या राजकीय पक्षाने आयोजित केलेले कार्यक्रम नाहीत. तरीही विरोधकांकडून होणारे मोदी यांच्या विरोधात केले जाणारे आंदोलन म्हणजे, पुणेकरांसाठी आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आहे. पुणे शहरातील पोलिस यंत्रणेवरील ताण तसेच गेल्या आठ दिवसात पुणे शहरात घडलेल्या घडामोडी पाहता, पोलिस यंत्रणेने विरोधकांकडून होऊ घातलेली आंदोलन होऊ देऊ नयेत असे आवाहन मोहोळ यांनी केले. यावेळी राजेश पांडे हे देखील उपस्थित होते.