आमची 'सेलिब्रेशन' इंडस्ट्री; पण वर्षभरात ६ कोटी लोकांचा रोजगार गेला अन् चेहऱ्यावरचं हसूच हरवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:37 PM2021-03-22T15:37:59+5:302021-03-22T15:40:14+5:30
.....अन्यथा आगामी सरकारी, निमसरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्यात येईल.
पुणेः आमची इंडस्ट्री 'सेलिब्रेशन' इंडस्ट्री आहे. पण गेल्या 1 वर्षांपासून आमच्या चेहऱ्यावरचं हसूच हरवून गेेले आहे. भारतात आमच्या व्यवसायातल्या तब्बल ६ कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे.त्यात एकट्या महाराष्ट्रातील २ कोटी लोकांचा समावेश आहे. तसेच पुण्यात ८ ते १० लाख लोक या व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकारने आमच्या व्यवसायाला कोरोना नियमांच्या सरसकट चौकटीत न बसवता धोरणात लवचिकता आणावी, अन्यथा आगामी सरकारी, निमसरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्यात येईल, असा गर्भित इशारा पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशनने दिला आहे.
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात सोमवारी ( दि. २२) असोसिएशनतर्फे सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशनतर्फे असोसिएशनचे अध्यक्ष सिकंदर रमजान शेख, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनचे सदस्य सोमनाथ धेंडे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा कुदळे, पुणे जिल्हा मांडव असोसिएशनचे अध्यक्ष सचिन भापकर, पुणे केटरिंग असोसिएशनचे महाराष्ट्राचे विश्वस्त जी.एस. बिंद्रा, पुणे केटरिंग असोसिएशनचे महाराष्ट्राचे विश्वस्त किशोर सरपोतदार हे उपस्थित होते. यात पुणे, मुंबई, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, रत्नागिरी अशा विविध ठिकाणांहून पदाधिकारी सहभागी झाले होते.
असोसिएशनचे अध्यक्ष सिकंदर रमजान शेख म्हणाले,
कोविडमुळे जवळपास 12 महिने कोणतेही मोठे कार्यक्रम झाले नाही. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत मिळत असल्याने शासनाने पूर्व परवानगी दिलेल्या आस्थापनांना देखील काही नियम व अटी घालून बंधने घातली आहेत. चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यांना 50 टक्के उपस्थितीस, तर लग्न समारंभात 50 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी दिली आहे. परंतू लॉन्स किंवा बँक्वेट हॉल यांची रचना मूलतः एक हजार किंवा त्याहून व्यक्तींच्या दृष्टीने केलेली असते. अशा पार्श्वभूमीवर लग्न समारंभांना केवळ 50 पन्नास व्यक्तींची परवानगी दिल्याने लॉन्स किंवा बँक्वेट हॉलचे संपूर्ण आर्थिक नियोजन ढासळत आहे.
साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफर्स, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. मार्च, एप्रिल, मे हा आमचा व्यवसायाचा मुख्य काळ असतो. या काळात होणाऱ्या व्यवसायावर आधारीतच आगामी काळ आम्ही व्यतित करत असतो. तसेच सरकारच्या निर्णयामुळे या व्यवसायवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेले हजारो कामगारांच्या रोजगारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले.
पुणे केटरिंग असोसिएशनचे विश्वस्त किशोर सरपोतदार म्हणाले, कोरोनाचे नियम कडक पद्धतीने पालन करण्यात येईल. पूर्णपणे साहाय्य करण्याचा आमचा दृष्टीकोन असून सरकारने देखील आमचा विचार केला पाहिजे, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.
पुणे जिल्हा मांडव असोसिएशनचे अध्यक्ष सचिन भापकर म्हणाले, हजारो चौरस फूट लॉन्स किंवा हजार ते पंधराशे किंवा त्याहून जास्त क्षमता असलेल्या बॅंक्वेट हाॅल मध्ये केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्य लावावे हा निर्णय असोसिएशनवर अन्यायकारक आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते नगरसेवकापर्यंत सर्व पातळ्यांवर निवेदने देऊन झाली अाहेत. परंतु त्याबाबत गांभीर्याने विचार केला गेलेला नाही. आमच्या उद्योग व्यवसायांतून देशाच्या एकूण जीडीपीच्या आठ टक्के भाग, हा आमच्या असोसिएशन कडून दिला जातो. तरी सुद्धा आमच्या बाबत अन्यायकारक भूमिका घेतली जात असून आम्ही सनदशीर मार्गाने त्या भूमिकेचा निषेध करीत आहोत.