ST Strike: एसटी बंद असल्यानं आमचं शिक्षण थांबलं; शाळकरी मुलांची तक्रार, मुंबईत धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 07:51 PM2022-03-10T19:51:53+5:302022-03-10T19:52:01+5:30
एसटी वाचवा, एसटी वाढवा समितीने या आंदोलनासाठी पुढाकार घेत मुंबईत मंत्रालयासमोर धऱणे आंदोलन केले
पुणे : एसटी बंद असल्याने आमचे शिक्षण थांबले आहे, त्यामुळे काहीही करा पण एसटी सुरू करा अशी मागणी करत राज्यातील शाळकरी मुलांना गुरूवारी मुंबईत मंत्रालयासमोर धऱणे आंदोलन केले. एसटी वाचवा, एसटी वाढवा समितीने या आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
पुण्याहून गोरख मेंगडे यांच्यासमवेत हमाल पंचायतीच्या कष्टकरी विद्यालयाच्या विद्यार्थीनी आंदोलनासाठी मुंबईला गेल्या होत्या. त्याशिवाय राज्याच्या विविध भागांमधूनही अनेक शालेय विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. ज्यांना येणे शक्य झाले नाही, त्यांनी स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. स्त्री शिक्षणाच्या आग्रही, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना कृतीशील अभिवादन म्हणून आंदोलन करण्यात आले असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटी च्या कामगारांना त्यांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी संघर्ष करण्याचा पुर्ण अधिकार आहे, मात्र त्यांच्या संपामुळे आमची गैरसोय होत आहे. कोरोना काळानंतर नुकत्याच शाळा सुरू झाल्या, मात्र गावामधून शाळेत पोहचण्यासाठी एसटीच नाही. खासगी वाहनांचे शुल्क देता येत नाही, त्यात जागा मिळत नाही, ही वाहने नियमीत नसतात, त्यामुळे सरकार व एसटी कामगार यांनी एकत्र बसून मार्ग काढावा व एसटी त्वरीत सुरू करावी अशी मागणी करणारे निवेदन मुंबईत एसटीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सलग १३ महीने दिल्लीत चाललेले शेतकरी आंदोलनही काही मगण्या मान्य झाल्यावर स्थगित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सरकारने देऊ केलेले लाभ पदरात घेऊन सामान्य जनता व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी संप स्थगित करण्याचे आवाहन धरणे आंदोलनानंतर पवार व धनाजी गुरव, सुभाष लोमटे, प्रभाकर नारकर या पदाधिकाऱ्यांनी केले.