निवडणुकीनंतर आमच्यातले कौटुंबिक संबंध सुधारू शकतात; सुनेत्रा पवारांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 04:32 PM2024-04-16T16:32:21+5:302024-04-16T16:34:20+5:30
Baramati Lok Sabha: पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सुनेत्रा पवार यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
Sunetra Pawar ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात इतिहासात प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगत आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा पवार कुटुंबातील राजकीय संघर्षही टोकदार होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातून कुटुंबात कटुता निर्माण होणार का, याबाबत आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुनेत्रा पवार यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई होत असताना मूळ पवार कोण, याबद्दल दावे प्रतिदावे आणि वैयत्तिक टीका टिपण्णी होत आहे. पण या निवडणुकीच्या काळानंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
'चांगलं मताधिक्य मिळणार"
लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगलं मताधिक्य मिळेल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे. "आम्हाला नक्कीच चांगले मताधिक्य मिळणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. भोर एमआयडीसी आणि पुरंदर विमानतळाचा प्रश्न महत्वाचा आहे. मी ते काम करणार आहे. गेल्या २५ वर्षांत मी सामाजिक काम करत आहे. काटेवाडीच्या ग्राम स्वछता अभियान आणि निर्मल ग्राम योजना यावर मी काम केले. मला समाजकारणाचा अनुभव आहे," असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :
- दादांनी मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची भूमिका घेतली ती विकासासाठी.
- मी संसदेत माझे प्रश्न मांडू शकते.
- मी संधी मिळेल तिथे प्रश्न मांडते.
- ही लोकसभेची निवडणूक आहे, आरोप प्रत्यारोप होणारच.
- शाहू फुले आंबेडकरांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत.
- जनतेतून माझ्या उमेदवारीची मागणी होत होती. जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे.
- बेरोजगारी भोर वेल्हा भागात आणि पुरंदरचे विमानतळ हे प्रश्न महत्वाचे आहेत.
- दादाचं काम लोकांना माहीत आहे. लोकांचा दादावर विश्वास आहे.
- ही आयुष्यातील माझी पहिलीच निवडणूक आहे.