Aditya Thackrey: आमचं सरकार आलं कि दोषींवर कारवाई करू; आदित्य ठाकरे, पुणे पूरग्रस्त भागात पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:36 PM2024-07-30T16:36:28+5:302024-07-30T16:38:24+5:30
पूरग्रस्त भागातील लोकांचा संसार वाहून गेला, त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळेल का? आदित्य ठाकरेंचा सवाल
पुणे : पुण्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यावेळी मर्यादेपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले. त्या रात्री जलसंपदा विभागाने इशारा देऊनही महापालिका निद्रिस्त राहिली आणि सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, निंबजनगर, विठ्ठलवाडी भागातील जवळपास चार हजार जणांना आपले संसार पाण्यात सोडावे लागले. इशारा देऊनही कृती न झाल्यानेच ही आपत्ती ओढावली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग दोघांमध्ये समन्वय नसल्याचे सिद्ध झाले. यात झालेल्या अताेनात नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पुणेकरांनी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंहगड रोड भागातील नागरिकंना भेट दिली. तर आज माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागाची पाहणी कारण्याबरोबरच तेतेहील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीसुद्धा प्रशासनावर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, पाणी सोडलं तेव्हा न सांगता सोडल गेलं. तेही कित्येक जास्त पटीने सोडलं गेलं. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मी आता लोकांशी संवाद साधला. त्यांचे कपडे, घरातील वस्तू वाहून गेल्या आहेत. त्याची योग्य ती नुकसानभरपाई मिळेल का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. डोळयादेखत, नदीपात्रात राडारोडा टाकला जातोय. नदीपात्र साठी गुजरात मॉडेल वापरलं जातंय. साबरमती मॉडेल कॉपी पेस्ट करून नदी सुधार प्रकल्प करणार आहेत आहेत. हे चुकीचं वाटत आहे. यासंदर्भात मी प्रेझेंटेशन यापूर्वी दिलेलं होतं. नदी सुधारला विरोध नाही पण मी स्थगिती दिली होती. त्यातील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. या पूरपरिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आमचं सरकार आलं की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई आम्ही करू असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. अधिकाऱ्यांना निलंबित करून प्रश्न सुटणार नाहीत त्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.