राजकीय लोकांच्याबद्दल समाजात विचार भिन्नता : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 17:03 IST2025-01-04T17:02:49+5:302025-01-04T17:03:44+5:30
- देशाच्या उन्नतीसाठी महापुरुषांच्या आदर्श विचार आत्मसात करण्याची गरज; - पुरुषोत्तम खेडेकर यांचा अमृत महोत्सवा निमित्त विशेष गौरव

राजकीय लोकांच्याबद्दल समाजात विचार भिन्नता : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे : राजकारणात ज्यांच्याकडे सत्ता आहे. त्याच्याकडे लोक आकर्षित होत आहेत. सर्व राजकीय लोक पद,सत्ता संपत्तीची मागे लागले आहेत. प्रत्येकाला सत्ता आणि खुर्ची हवी आहे. सध्या राजकीय लोकांच्या विषयी समाजात विचार भिन्नता पाहायला मिळत आहे. त्यामुळे समाजात विचार शून्य व्यक्ती ही समस्या बनली आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सतं ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज अशा महापुरुषांच्या आदर्श विचार आत्मसात करण्याची गरज आहे. तरच देशाची उन्नती होऊ शकते असे प्रखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
विचार शून्यता ही समस्या बनली आहे. आपली कशा सोबत बांधिलकी आहे, हे लोकांना माहीत असले पाहिजे. पक्षात आणि संघटनेमध्ये कार्यकर्त्यांचा माणुस म्हणून विचार करायला हवा जो केला जात नाही. अलीकडे सत्ता येईल तिकडे नेते पळतात, सत्ता गेली की तिथून दुसरीकडे उड्या मारतात, जीवनात पैसा हा महत्त्वाचा असला तरी सर्वस्व नाही. त्याच प्रमाणे आरोग्यालाही महत्त्व द्यायला हवे असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ व युगनायक क्रांतीपुरूष पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव गौरव समिती यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय घोगरे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी आमदार रेखा खेडेकर,माधव पाटील शेळगावकर, ज्येष्ठ कवि इंद्रजित भालेराव, कर्नाटकचे आमदार डॉ. मारोतराव मुळे, निवृत्ती अधिकारी विक्रम बोके, व्यंकटराव गायकवाड,मुख्य अभियंता हेमंतकुमार देशमुख, विठ्ठल गायकवाड, गिरीश जोशी, आमदार शंकर जगताप,राजेंद्र पवार,रवींद्र माळवदकर इ.उपस्थित होते. यावेळी मदन पाटील लिखित 'क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर' या गौरव ग्रंथाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यापुढे गडकरी म्हणाले, समाजातील अस्पृश्यता, जातीयता, विषमता संपुष्टात आली पाहिजे. कारण तुमची गुणवत्ताच तुम्हाला श्रेष्ठ बनवते. ज्यामुळे जातपात, भाषा, राज्य आणि पंथाच्या पलीकडे जावून तुम्हाला ओळख मिळते. ही गुणवत्ता ज्ञानातून मिळते. आज जर भारताला विश्वगुरू बनायचे असेल तर ज्ञान महत्त्वाचे आहे.
मी माझ्या आई - वडिलानंतर शिवाजी महाराजांना मानतो. कारण प्रत्येक पायंड्यांवर त्यांच्या सारखा आदर्श राजा दुसरा कोणी नाही. ते खऱ्या अर्थाने सेक्युलर होते. कारण सर्वधर्म समभाव असणारे ते एकमेव राजे होते. त्यांनी स्वराज्याचा विस्तार करताना दुसऱ्या धर्माची प्रार्थनास्थळे पाडली नाहीत, कोणत्याही महिलांवर अन्याय, अत्याचार केले नाहीत असेही गडकरी यांनी नमूद केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेतला, एक शासकीय अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करून सामाजिक संघटन कसे वाढविले व नोकरीत असताना तरुणांना रोजगाराच्या संधी कशी उपलब्ध करून दिली याबाबत माहिती दिली.
याकार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर बनबरे यांनी केले. 'क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर' या गौरव ग्रंथाचे वाचन इंद्रजीत भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा खेडेकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना - अनुश्री पाटील यांच्या जिजाऊ वंदनेने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ खेडेकर,संतोष शिंदे,उत्तम कामठे,अविनाश मोहिते,चंद्रशेखर घाडगे,मनोज गायकवाड,अविनाश घोडके,प्रशांत धुमाळ यांनी परिश्रम घेतले.
शेतक-यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून ज्ञान घ्वावे
शेतकरी हा उर्जा, इंधन दाता आहे. नागपूर विमानतळ झाल्यावर पहिले विमान हे शेतक-यांनी बनवलेल्या इंधनावर विमान उडाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून शेतकरी आर्थिक दुष्टया सक्षम होण्यासाठी प्रगतशील शेतक-यांनी ज्ञान आत्मसात करून प्रगती केली पाहिजे असे मत व्यक्त केले.