'शांतता राखली जावी अशीच आमची भूमिका; भोंग्यांबाबत कायद्यानुसार कार्यवाही करू', पुण्यातील मुस्लिम संघटनांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 01:52 PM2022-04-22T13:52:05+5:302022-04-22T13:52:16+5:30
धार्मिक स्थळांवर ध्वनिक्षेपक लावण्याबाबत, आवाजाच्या मर्यादेबाबत कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल
पुणे : धार्मिक स्थळांवर ध्वनिक्षेपक लावण्याबाबत, आवाजाच्या मर्यादेबाबत कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल. सर्व धार्मिक स्थळांना याबाबतच्या अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन- मदत करण्याची आमची भूमिका आहे, असा सूर मुस्लिम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींच्या बैठकीत उमटला.
‘अवामी महाझ’ सामाजिक संघटनेने ही बैठक बोलवली होती. आझम कॅम्पस येथे ही बैठक २१ एप्रिल रोजी सकाळी झाली. अध्यक्षस्थानी अवामी महाजचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते. रिपब्लिकन पक्षाचे ॲड. अयूब शेख, नुरुद्दीन सोमजी, ॲड. शेरकर, अवामी महाझ सामाजिक संघटनेचे सचिव वाहिद बियाबानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इक्बाल शेख, मशकूर शेख, इक्बाल अन्सारी, मुश्ताक पठाण, अंजुम इनामदार, इक्बाल तांबोळी, असलम बागवान यांच्यासह अनेक प्रतिनिधी सभागृहात उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे हे अर्ज देण्याची सुविधा आहे. वक्फ बोर्डाचे प्रमाणपत्र जोडावे, असे ॲड. अयूब शेख यांनी सांगितले. आवाजाची मर्यादा प्रमाणात ठेवण्याबाबत कायद्याच्या तरतुदी प्रमाण मानल्या जातील, असे अनेक प्रतिनिधींनी सांगितले.
डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, ‘मशिदींचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली जात आहे. इतर धर्माच्या धर्मस्थळांना देखील ध्वनिक्षेपक परवानगीसाठी कायदेशीर प्रक्रियेत मदत करू. निवडणुका असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर काही मुद्दे पुढे आणले जात असले शांतता, सुव्यवस्था राखली जावी, अशी आमची भूमिका आहे. तीच सर्वांची भूमिका असली पाहिजे.’