प्रवेशप्रक्रियेतून १३ हजार विद्यार्थी बाहेर

By admin | Published: June 28, 2015 12:31 AM2015-06-28T00:31:13+5:302015-06-28T00:31:13+5:30

अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी पात्र ठरूनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केल्याने तब्बल १३ हजार विद्यार्थी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत.

Out of 13 thousand students out of the entrance process | प्रवेशप्रक्रियेतून १३ हजार विद्यार्थी बाहेर

प्रवेशप्रक्रियेतून १३ हजार विद्यार्थी बाहेर

Next

पुणे : अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी पात्र ठरूनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केल्याने तब्बल १३ हजार विद्यार्थी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. शनिवारी अखेरच्या दिवसापर्यंत सुमारे ४१ हजार ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. आता दि. २ जुलै रोजी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीमध्ये पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या,तसेच बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेंतर्गत बुधवारी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. यादीत ५५ हजार २० विद्यार्थ्यांना स्थान मिळाले होते. या विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक होते. मात्र, या कालावधीत ४१ हजार ८०५ विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर, १२ हजार ९३३ विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी फिरकले नाहीत. प्रवेश निश्चित न केल्याने हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यांना आता यापुढे आॅनलाईन प्रक्रियेतून प्रवेश मिळणार नाही. तसेच जातप्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला न देऊ शकलेल्या १५६ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला आहे. तर, १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक व केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी दिली.
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अधिक संधी असेल. या शाखेतील ५ हजार २६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. तसेच वाणिज्य मराठीला ३२८४, तर वाणिज्य इंग्रजीला २९९७ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली. कला शाखेच्या मराठी व इंग्रजीसाठीही अनुक्रमे १०२६ व ३६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये त्यांच्या गुणांच्या जवळपास असलेल्या व संबंंधित महाविद्यालयाचा पसंतीक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत वरचे महाविद्यालय मिळू शकेल.

ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित होऊनही प्रवेश घेतला नाही, ते विद्यार्थी या प्रक्रियेतून आपोआपच बाहेर पडले आहेत. या विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असावा किंवा त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतील. दर वर्षीच अशाप्रकारे विद्यार्थी यादीत नाव असूनही प्रवेशाकडे पाठ फिरवतात.
- रामचंद्र जाधव, विभागीय शिक्षण उपसंचालक

Web Title: Out of 13 thousand students out of the entrance process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.