शिक्षण मंडळाच्या ३४२ कोटींपैकी विद्यार्थ्यांवर शून्य खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:52+5:302021-07-05T04:08:52+5:30
लक्ष्मण मोरे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या ऑनलाईन शिक्षणाचा बोऱ्या वाजलेला असतानाच नवीन माहिती समोर आली ...
लक्ष्मण मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या ऑनलाईन शिक्षणाचा बोऱ्या वाजलेला असतानाच नवीन माहिती समोर आली आहे. मंडळाच्या ३४२ कोटी ८२ लाखांच्या तरतुदीमधून मागील दीड वर्षात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांवर अवघा एक रुपयाही खर्च झालेला नाही. प्रशासकीय खर्च, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वेतन असा तब्बल २८४ कोटी ४७ लाखांचा खर्च झाला आहे. त्यातच स्थायी समितीनेही तीन कोटींचा निधी वर्गीकरणाद्वारे पळवला आहे. त्यामुळे मुलांच्या भवितव्याबाबत पालिका किती गांभीर्याने विचार करत आहे, याचे उदाहरण समोर आले आहे.
शिक्षण मंडळाकडून दरवर्षी मुलांकरिता शालेय साहित्याची खरेदी केली जाते. यासोबतच गणवेश, बूटमोजे, दप्तरे, वह्या, चित्रकला साहित्य, लेखन साहित्य, पाट्या, वाचनालय पुस्तके, शारीरिक शिक्षण साहित्य, बनियन-पेटीकोट, स्टेशनरी खरेदी केली जाते. शिष्यवृत्ती खर्च, शैक्षणिक उपक्रम तसेच, क्रीडानिकेतनसाठी क्रीडा साहित्य, ट्रॅकसूट साहित्य व बूट, विद्यार्थी वाहतूक व्यवस्था, अल्पोपहार, मैदान देखभाल यावरही खर्च होतो. यातील बहुतांश गोष्टींवर खर्च झालेला नाही.
मात्र, कोरोनाकाळातच शाळा सुधार मोहिमेवर २१ लाखांचा, मॉडेल स्कूलवर १ कोटी ८२ लाख, बालवाडी पोषण आहारावर १९ लाख ३३ हजार, शाळा इमारत व मैदान दुरुस्तीवर १८ लाख ३३ हजार असे खर्च मात्र केले आहेत. तसेच विविध स्पर्धासाठी १९ लाख २४ हजार रुपयांचा खर्च झाल्याचेही नमूद आहे.
-----
स्थायी समितीने शिक्षण मंडळाचा ३ कोटी १७ लाख ५७ हजार ६०८ रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे पळवला आहे. यामध्ये फर्निचर व इतर साहित्य खरेदी व दुरुस्तीच्या निधीमधून ६३ लाख, शैक्षणिक सहलींचा १ कोटी ४५ लाख, विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षणाच्या १ कोटी ८ लाखांचा समावेश आहे.
-----
शिक्षण मंडळासाठी सन २०२०-२१ साठी ३४२ कोटी ८२ लाख ३७ हजार रुपयांचे अंदाजपत्रक मान्य करण्यात आले होते. यामधून वेतनावर २७० कोटी ७९ लाख रुपये खर्च झाला आहे. तर, संकीर्ण, दूरध्वनी, कार्यालयीन लेखन साहित्य, भवन भाडे, दैनंदिन स्वच्छता आदींवर देखील मोठा खर्च झालेला आहे.
-----
शाळा बंद तरी ‘पास’साठी सव्वा कोटी खर्च
कोरोनाकाळात शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांच्या बसपासपोटी तब्बल १ कोटी ३० लाख ३८ हजारांचा खर्च दाखविला आहे. तसेच विद्यार्थी वाहतुकीवर आणखी ४१ लाख ३७ हजारांचा खर्च झाल्याचेही दर्शविले आहे.
-----
मुलांना टॅब नाहीच
मागील वर्षी मुलांना टॅब देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर केला होता. मात्र, विद्यार्थ्यांना हे टॅब मिळालेच नाहीत. विद्यार्थ्यांवरील वाचलेल्या खर्चामधून मुलांना टॅब देण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही.
----