पुण्यातील लोकसभेच्या स्पर्धेतून बाहेर; मुळीक यांची कार्यकर्त्यांसाठी भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:26 PM2024-03-14T12:26:22+5:302024-03-14T12:29:38+5:30

पुण्यातील जागेसाठी मोहोळ यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी भाजपाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

Out of the Lok Sabha race in Pune, Jagdish Mulik's emotional post for activists | पुण्यातील लोकसभेच्या स्पर्धेतून बाहेर; मुळीक यांची कार्यकर्त्यांसाठी भावनिक पोस्ट

पुण्यातील लोकसभेच्या स्पर्धेतून बाहेर; मुळीक यांची कार्यकर्त्यांसाठी भावनिक पोस्ट

भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाची दुसरी आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली. त्यामध्ये, २० जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून माजी खासदार आणि दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या जागेवर पुण्यात कोणाला लोकसभेची उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, पुण्यातील जागेसाठी भाजपाकडून ३ ते ४ नावांची चर्चा होती. त्यापैकी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यात स्पर्धा दिसून येत होती. मात्र, भाजपाने उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केल्यानंतर मुरलीधर मोहोळ हेच भाजपाचे पुण्यातील उमेदवार असल्याचे जाहीर झाले.  

पुण्यातील जागेसाठी मोहोळ यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी भाजपाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. तसेच, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, एक कार्यकर्ते ते लोकसभा उमेदवार इथपर्यंतचा माझा प्रवास आहे. भाजपामध्येच एका कार्यकर्त्याला अशाप्रकारे नेतृत्व करण्याची संधी मिळते, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले. तर, पुण्यातील जागेसाठी ३ ते ४ जण इच्छुक होते, सर्वचजण पात्रही होते. मात्र, पक्षाने माझ्या नावाची निवड केली. इथे माझं केवळ नाव असून ती जागा भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नरेंद्र मोदींनी एक मत देण्यासाठी लढवायची आहे, असेही मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे, मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्याने जगदीश मुळीक नाराज झाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आता, जगदीश मुळीक यांनी सोशल मीडियावर कार्यकर्त्यांसाठी भावनिक पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, आपण जनतेच्या सेवेत कायमच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol)  आणि जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात होतं. या प्रकरणी आणि लोकसभा उमेदवारी या विषयांवरून जगदीश मुळीक यांनी काही दिवसांपूर्वी फडणवींसांची भेट घेतली होती. सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस आणि जगदीश मुळीक यांच्यामध्ये चर्चा झाली. पुणे लोकसभेला पुण्याची माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पुणे भाजपमधील वाद उफाळून आल्याची चर्चा होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

जनतेच्या सेवेत कायमच!

कोणतेही पद नसतानाही माझ्या साठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे, जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद, अशी भावनिक पोस्ट मुळीक यांनी कार्यकर्त्यांसाठी केली आहे. 

मोहोळ विरुद्ध धंगेकर

भारतीय जनता पक्षाची पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर झाली. आता प्रतिक्षा काँग्रेसच्या उमेदवाराची आहे. कसबा विधानसभेची पोटनिवडणुक जिंकून काँग्रेसला विजयाचा गुलाल मिळवून देणारे आमदार रविंद्र धंगेकर काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. भाजपप्रणित महायुतीचे मोहोळ व काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीचे धंगेकर अशी लढत झाली तर ती रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

मोहोळ यांच्याकडे यापूर्वीच जबाबदारी

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ व ४८ लोकसभा मतदारसंघ तसेच महापालिका निवडणुकांसाठी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. त्यात मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातीलच मावळ, शिरूर, बारामती या अन्य लोकसभा मतदारसंघांसाठी अनुक्रमे प्रशांत ठाकूर, आमदार महेश लांडगे व आमदार राहूल कूल यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता, त्याच मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. 
 

Web Title: Out of the Lok Sabha race in Pune, Jagdish Mulik's emotional post for activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.