Omicron: पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनचाही उद्रेक; जिल्ह्यात रविवारी तब्बल ४६ रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 08:44 PM2022-01-02T20:44:54+5:302022-01-03T00:31:16+5:30
राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळून आले.
पुणे : रविवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्येसह ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णसंख्येचा उद्रेक पहायला मिळाला. राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळून आले. त्यापैकी ४६ रुग्ण पुणे जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. ५० पैकी ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) तर १२ रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी रिपोर्ट केले आहेत.
पुणे शहरात ३६, पिंपरी चिंचवडमध्ये ८ तर पुणे ग्रामीणमध्ये २ रुग्णांची नोंद झाली आहे. आजवर राज्यात ५१० ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी पुणे शहरात ४९, पिंपरी चिंचवडमध्ये ३६ आणि पुणे ग्रामीणमध्ये २३ रुग्ण आढळून आले आहेत. ५१० पैकी यापैकी १९३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २२८४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १३४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
गर्दी रोखण्यापासूनच प्रसाराचा वेग कमी करता येईल
''जनुकीय चाचणीसाठी जास्त नमुने पुणे जिल्ह्यातून गेल्याने रविवारी पुण्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या जास्त दिसत आहे. सामुदायिक सर्वेक्षणातून काही बाधित आढळून आले आहेत. सामूहिक संसर्गाबाबत आयसीएमआरकडून अधिकृत अभ्यास पुढे येऊ शकेल. गर्दी रोखण्यापासूनच प्रसाराचा वेग कमी करता येऊ शकतो. लॉकडाऊन न करता आर्थिक व्यवहार सुरू ठेवून गर्दी रोखण्यासाठी निर्बंध कडक करण्याच्या दृष्टीने शासन आणि प्रशासन पातळीवर नियोजन सुरू आहे असे राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.''
खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्याच्या पायाभूत सुविधा सज्ज
''शहरात कोरोनाबधित आणि ओमायक्रॉनबाधितांची संख्या वाढत असताना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर दिला जाणार आहे. सध्या एका बाधित व्यक्तिमागे ८/ते १२ जणांचे ट्रेसिंग केले जात आहे. पॉझिटिव्हीटी रेट अधिक वाढल्यास हे प्रमाण १० - २२ पर्यंत वाढवले जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्याच्या पायाभूत सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सध्या बाणेरचे जम्बो रुग्णालय, नायडू रुग्णालय सुरू असून गरज भासल्यास दळवी रुग्णालय, लायगुडे रुग्णालय, खेडकर हॉस्पिटल तसेच इतर रुग्णालये तातडीने सुरू करता येऊ शकतात असे पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.''