जिल्ह्यात लाळ्याखुरकत, लंपी आजाराचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:02+5:302021-09-23T04:13:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एकीकडे कोरोनामुळे सर्वसामान्य त्रस्त असताना जनावरांमध्येही विषाणूजन्य आजारांची लागण झाली आहे. जिल्ह्यात लाळ्या-खुरकत आणि ...

Outbreak of salivary gland, Lampi disease in the district | जिल्ह्यात लाळ्याखुरकत, लंपी आजाराचा उद्रेक

जिल्ह्यात लाळ्याखुरकत, लंपी आजाराचा उद्रेक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एकीकडे कोरोनामुळे सर्वसामान्य त्रस्त असताना जनावरांमध्येही विषाणूजन्य आजारांची लागण झाली आहे. जिल्ह्यात लाळ्या-खुरकत आणि लंपी आजाराचा उद्रेक झाला आहे. लंपी आजारावर लस उपलब्ध नसल्याने पशुपालक धास्तावले आहेत. लाळ्या-खुरकत रोगावरील लस उपलब्ध असली तरी लसीकरण संथगतीने होत आहे. मंगळवारी डाळज नं. २ येथे एकाच गोठ्यातील ११ जनावरांचा मृत्यू झाला. या जनावरांत अत्यंत धोकादायक असलेला ‘ओ’ व्हेरिअंट आढळला आहे.

जिल्ह्यात जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक गायवर्ग आणि म्हैस वर्गातील पशुधन आहेत. अनेकांचा उदरनिर्वाह या जनावरांवर आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बदललेले वातावरण आणि सतत होत असलेल्या पावसामुळे जनावरांनाही विषाणूजन्य आजारांची लागण होत आहे. लाळ्या-खुरकत आणि लंपी हा अत्यंत घातक आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. लाळ्या-खुरकत आजारामुळे खेड, मावळ, मुळशी तालुुक्यात मोठ्या प्रमाणात जनावरांना या आजारांची लागण झाली आहे. आतापर्यंत खेड आणि बारामती तालुक्यात पशुपालकांचे पशुधन या रोगांमुळे दगावली आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात लाळ्या-खुरकत रोगावरील लस आली. जवळपास १० लाख डोस जिल्ह्याला मिळाले. सध्या याचे लसीकरण सुरू आहे. मात्र, हे लसीकरण संथ होत असल्याने लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे. लाळ्या-खुरकत आजारामध्ये जनावरांच्या तोेंडात जखमा होत असल्याने त्यांना खाताना अडचणी निर्माण होतात. यामुळे ती दगावतात.

लंपी या आजारात जनावरांच्या अंगावर गाठी येतात. काही दिवसांनी त्याच्या जखमा होतात. त्यामुळे जनावरे दगावतात. जनावरांमध्ये आढळणारा हा सर्वात घातक रोग आहे. यावर अजूनही लस आलेली नाही. सध्या या आजारावर शेळ्यांना होणाऱ्या देवीच्या आजारावरील लस दिली जात आहे. जिल्ह्याला याचे ७१ हजार २०० डोस मिळाले आहेत. असे असले तरी अनेक तालुक्यात ही लस अद्यापही उपलब्ध न झाल्याने ती त्वरित देण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे.

चौकट

अशी घ्या जनावरांची काळजी

- लाळ्या-खुरकत आजारामध्ये जनावरांना चावताना त्रास होतो. यामुळे त्यांना मऊ चारा खाऊ घालावा. मका, घास, हिरवा चारा या प्रकारचे अन्न द्यावे. शक्यतोवर जनावरांचे लसीकरण प्राधान्याने करावे. यामुळे जनावरे दगावण्याचा धोका कमी होतो.

- लंपी आजारापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्यामध्ये चावणाऱ्या माशा होणार नाही याची पशुपालकांनी काळजी घ्यावी. जनावरांच्या अंगावर आलेल्या गाठींना औषधी मलम लावावे. जनावरांना ताप असल्यास त्यावर औषध द्यावे.

चौकट

डाळज नं. २ येथे एकाच पशुपालकांची ११ जनावरे लाळ्या-खुरकत रोगाने दगावली. या जनावरांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून या जनावरांना निमोनिया झाल्याचे आढळले. तसेच लाळ्या-खुरकतचा सर्वात धोकादायक असलेला ‘ओ’ व्हेरिअंट सापडला असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली.

चौकट

४२ हजार ४०१ जनावरांचे लसीकरण

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यात ३३ हजार २२७ गाय वर्गातील जनावरांचे लसीकरण झाले. तर म्हैस वर्गातील ९ हजार १२७ जनावरांचे लसीकरण झाले आहे.

कोट

लाळ्या-खुरकत आणि लंपीचा वाढता प्रादुर्भाव आटाेक्यात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पशुपालकांनी त्यांच्या जनावरांची काळजी घ्यावी. डाळज येथील शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने त्याला प्रत्येक जनावरामागे जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेतून १५ हजार रुपये देणार आहोत.

- बाबुराव वायकर, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती

Web Title: Outbreak of salivary gland, Lampi disease in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.