राजगुरुनगरमध्ये कचऱ्याच्या समस्येविषयी तरुणाईचा उद्रेक! नगरपरिषदेच्या दारात टाकला कचरा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:24 PM2021-06-11T12:24:21+5:302021-06-11T12:24:28+5:30
प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात
राजगुरुनगर: नगरपरिषद हद्दीमधील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. खेड पोलीस स्टेशनच्या मागे रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे निदर्शनास आल्यानंतर राजगुरुनगरमधील अनेक तरुणांनी एकत्र येऊन नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना कचरा उचलण्यासंबंधीचे निवेदन दिले होते. सदर निवेदनाला नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आली.
"आम्ही राजगुरुनगरकर" वासीयांच्या वतीने आज कचऱ्याच्या गाड्या कचरा डेपोमध्ये खाली न करता राजगुरुनगर नगरपरिषदेच्या दारात खाली करून कचऱ्याचा ढीग लावण्यात आला. मुजोर प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी यांनी येत्या चार दिवसांत कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सदर कचऱ्याची समस्या चार दिवसांत न सोडवल्यास पुढील वेळेस कचऱ्याच्या गाड्या नगरपरिषदेच्या कार्यालयात खाली करून अतिशय तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा "आम्ही राजगुरुनगरकर" वासीयांच्या वतीने देण्यात आला.