सरत्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:09 AM2021-04-05T04:09:17+5:302021-04-05T04:09:17+5:30
पुणे : शहराने सरत्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट अनुभवला. आजवरच्या सर्वाधिक चाचण्या, सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आणि सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट ...
पुणे : शहराने सरत्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट अनुभवला. आजवरच्या सर्वाधिक चाचण्या, सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आणि सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट असे या आठवड्याच्या कोरोना स्थितीचे वर्णन करता येईल. पुढील आठवड्यात रुग्णसंख्येची विक्रमी नोंद होणार असल्याची शक्यता वैद्यकतज्ज्ञांनी नोंदवल्यामुळे
पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
शहरात मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत रुग्णसंख्या दररोज नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. ४ एप्रिल रोजी आजवरची सर्वाधिक ६२२५ इतकी रुग्णसंख्या नोंदवली गेली. १ एप्रिल रोजी २०६८१ इतक्या आजवरच्या एका दिवसातल्या सर्वाधिक चाचण्या पार पडल्या.
२९ मार्च ते ४ एप्रिल या एका आठवड्याच्या कालावधीत एकूण १,२३,५९९ चाचण्या पार पडल्या. यापैकी ३०,९३२ रुग्ण कोरोनाग्रस्त आढळून आले. या आठवड्यात १९२ रुग्णांचा मृत्यू झाला. संपूर्ण आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट २५.०२ टक्के इतका नोंदवला गेला. मृत्युदर १ टक्क्याहून कमी असल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असला तरी रुग्ण गंभीर होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
एकीकडे रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात, बेड मिळवण्यासाठी रुग्णांची तारांबळ उडत आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीला रविवारी दिवसभरात बेड मिळवण्यासाठी ७-८ रुग्णांचे फोन आले. त्यातील दोन जणांना ऑक्सिजन बेड, तिघांना व्हेंटिलेटर तर दोघांना ऑक्सिजनविरहित बेडची गरज भासत होती. मात्र, बेड मिळवण्यासाठी दिवसभर प्रयत्न करूनही रुग्णालयांमध्ये सोय होऊ शकली नाही.
------
दिनांक चाचण्या रुग्ण मृत्यू पॉझिटिव्हिटी रेट
२९-३ १५१५३ २५४७ २४ १६.२०
३०-३ १३४३६ ३२२६ २७ २४.०१
३१-३ १६४४६ ४४५८ ३२ २७.१०
१-४ २०६८१ ४१०३ ३५ १९.८३
२-४ २००७३ ४६५३ ३९ २३.१८
३-४ २००६६ ५७२० ३५ २८.५०
४-४ १७७७४ ६२२५ ४१ ३५.०२
-----------
एकूण १,२३,५९९ ३०,९३२ २३३