एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 AM2021-03-13T04:18:43+5:302021-03-13T04:18:43+5:30
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा अयोगाने (एमपीएससी) १४ मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली असल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले. ...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा अयोगाने (एमपीएससी) १४ मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली असल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली परीक्षा अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला. पुण्यातील नवी पेठेतील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून शासनाविरोधात रोष व्यक्त केला.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नाही. असे पत्र पुनर्वसन विभागाने १० मार्चला एमपीएससीला दिले होते. त्यांच्या सूचनेनुसार ही परीक्षा पुढे ढकलली जात आहे, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
एमपीएससीने आतापर्यंत ५ ते ६ वेळा परीक्षा पुढे ढकलली आहे. गेल्या वर्षी एप्रिल २०२० मध्ये राज्यसेवा व इतर परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या होत्या. मराठा आरक्षणावर स्थगिती येण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर २०२०, १ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ची परीक्षा २२ नोव्हेंबर २०२० रोजी होणार होती. या तीन परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. यावर मराठा संघटनांनी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत परीक्षा घेऊ नये, अशी मागणी केली होती. यावर नाराज होत इतर समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा येत्या रविववारी (दि. १४), तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ची परीक्षा ११ एप्रिल रोजी होईल. असे आयोगाने स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी होईल, तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ची परीक्षा ११ एप्रिल रोजी होईल, असे परिपत्रक प्रसिद्ध करून सांगितले होते.
चौकट
शासनाने विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेतला
या पूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर २०२०ला होणार होती. त्यावेळी सरकाने अवघ्या दोन दिवसआधी म्हणजेच ९ ऑक्टोबरला परीक्षा पुढे ढकल्याचे जाहीर केले होते. यावेळी देखील सरकाने १४ मार्चची परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर आलेली असताना अचानक रद्द करून विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेतला आहे.
कोट
एमपीएसीच्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीमध्ये ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले होते. या तारखा आता अंतिम आहेत असे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. याचा विसर त्यांना पडला असून त्यांनी विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्याच निर्णयावर ते ठाम नाहीत. पुन्हा एकदा राज्यसेवा परीक्षा स्थगित करून सरकार तरुणांबद्दल गंभीर नसल्याचे स्पष्ट केले आहे.
-महेश बडे, प्रमुख, एमपीएससी स्टुडंट्स राईटसचे