अरे बापरे ! पुण्यात अवघ्या एका महिन्यात झाली तब्बल तीन लाख मोबाईलची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 02:03 PM2020-10-08T14:03:59+5:302020-10-08T16:04:10+5:30
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना नवीन मोबाईल घेऊन देणे पालकांना भाग पडले.
तेजस टवलारकर-
पिंपरी : पुणे जिल्ह्यात दरमहा सरासरी एक लाख वीस हजार मोबाईल विकले जातात. कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शाळा आणि शिकवणी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मेपासूनच मोबाईलची मागणी वाढली होती. जूनमध्ये जिल्ह्यात तीन लाखांवर मोबाईलची विक्री झाल्याची माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे पुणे जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमोडे यांनी दिली.
सात ते पंधरा हजार रूपयांपर्यंतच्या मोबाईल खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली आहे. जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती या भागात सर्वाधिक मोबाईल विक्री झाली आहे. पुणे जिल्ह्यात ४५०० मोबाईल विक्रेते आहेत. पुणे अणि पिंपरी-चिंचवड परिसरात शाळांची आणि खासगी शिकवणींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. लॅपटॉप, कॉम्प्युटर विकत घेणे प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे मोबाईलच्या मागणीत वाढ झाली आहे.
विक्रेत्यांनी सांगितले की, मार्च आणि मे महिन्यात लॉकडाऊन होते. मे महिन्यात काही प्रमाणात सुट देण्यात आली होती. मोबाईलची मागणी मेपासून सुरू झाली होती. परंतु, त्यावेळी ग्राहक संभ्रमात होते. जून महिन्यात मागणी सर्वाधिक वाढली होती.
कोरोनापूर्वी मुले मोबाईलच्या नादात अभ्यास करत नाहीत,अशी ओरड सर्वच स्तरातून होत असे. परंतु, मार्चपासून कोरोनाचे संकट सुरू झाले. तेव्हापासून शाळा आणि शिकवणी वर्ग बंद आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन शाळा आणि शिकवणी सुरू आहेत. विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल घेऊन देणे पालकांना भाग पडले. त्यामुळे मोबाईल विक्रीचे प्रमाण वाढले आहे.
---
जूननंतर ४० टक्क्यांनी मागणीत घट
जूनमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल विक्री झाली. मात्र, त्यानंतर साधारण ६० ते ७० हजार मोबाईल संपूर्ण पुणे जिल्ह्यात विकले जात आहेत. मे आणि जूनमध्येच मोबाईलला मागणी वाढली होती. आता ४० टकक्यांनी त्यात घट झाली आहे.
---
लॉकडाऊननंतर सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र, मेपासून मोबाईलच्या खरेदीचे प्रमाण वाढत गेले. दरवर्षी जूनमध्ये सुरु होणारी शाळा-महाविद्यालये यंदा ऑनलाइन सुरु झाली आहेत. ऑनलाइनशिक्षणासाठी जूनमध्ये मोबाईल खरेदीचे प्रमाण दुप्पट वाढले आणि सर्वाधिक विक्री जूनमध्ये झाली.
- सुधीर वाघमोडे, पुणे जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन