ओतूरला बंधारे, रस्ते गेले वाहून
By admin | Published: July 13, 2016 12:35 AM2016-07-13T00:35:57+5:302016-07-13T00:35:57+5:30
परिसरात तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान काही शेतकऱ्यांच्या विहिरी-घरे पडून नुकसान झाले
ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) परिसरात तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान काही शेतकऱ्यांच्या विहिरी-घरे पडून नुकसान झाले. विविध वाड्या-वस्त्यांना जोडणारे रस्ते, पूल वाहून गेल्यामुळे नुकसान झाले. या भागातील घरे, विहिरी, उभी पिके, रस्ते वाहून गेल्याने ग्रामस्थ व शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या या नुकसानाचे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ओतूरचे सरपंच धनंजय पाटील डुंबरे यांनी केली आहे.
शुक्रवारी, शनिवारी व रविवारी या विभागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओतूूर गावाजवळील गाढवेपट, पानसरेपट, डोमेवाडी, पानसरेवाडी, राहाटी, ढमालेमळा, भांडवळण, घुलेपट, तांबेमळा नं. १, नं. २, मानभवमळा आदी ठिकाणी शेतकऱ्यांनी टोमॅटो, सोयाबीन, वालवड, फरशी, फ्लॉवर, काकडी, मिरची, कोबी, मेथी, कोथिंबीर, पालक, भुईमूग आदी पिके, पालेभाज्या, ऊस ही नगदी पिके घेतली. परंतु, या पावसामुळे शेतात पाणी साठले व लगतच्या शेतकऱ्यांच्या शेताचे बांध, ताली फुटल्यामुळे पाण्याच्या जोराने व सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही पिके पाण्यात सडली. काही पिके पाणलोटामुळे वाहून जाऊन नुकसान झाले.
गाढवेपट, पानसरेपट, भावळी रस्ता, मुंजेवाडी रस्ता व रस्त्यावरील पूलही वाहून गेला. ओतूर ग्रामपंचायतीने शेटेवाडी परिसरात दोन बंधारे बांधले होते. हे दोन्ही
बंधारे फुटून वाहून गेले. ओतूर (ता. जुन्नर) येथे दशक्रिया विधीच्या ठिकाणी असलेले कंपाऊंट लोखंडी कठड्यासह वाहून गेले. येथील स्मशानभूमीही पुराच्या पाण्याखाली गेल्याने तिचेही नुकसान झाले. ओतूरजवळील आधार नलावडे व श्रीकृष्ण रामचंद्र डुंबरे या दोघांच्या (नवीन) विहिरी पाण्याच्या जोरामुळे पडून नुकसान झाले.
ओतूर शहरात जी जुने घरे होती, तीही अतिवृष्टीमुळे खचून पडली. अशा घरांची संख्या २० आहे. देवगल्ली येथे व डोमेवाडी येथील बाळू बाबाजी मोरे यांची घरे पडून अतिवृष्टीमुळे घरातील सर्व सामान व संसार भिजून नुकसान झाले.
ओतूर परिसरात ऊस, केळीबरोबर कांदा व टोमॅटो ही प्रमुख पिके आहे. डोमेवाडी परिसरात १०० एकर नवीन जातीच्या टोमॅटोची लागवड केली होती. या टोमॅटोची तोडणीही सुरू होती. एक एकर टोमॅटोसाठी शेतकऱ्याला सुमारे दीड लाख रुपये खर्च येतो; परंतु अतिवृष्टीमुळे डोमेवाडी व ओतूर परिसरातील सर्व टोमॅटो उत्पादकांच्या टोमॅटोपिकाचे, बागांचे १०० टक्के नुकसान झाले आहे, असे बबन अर्जुन भोरे यांनी सांगितले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
ओतूर विभागात कांदा हेही प्रमुख पीक आहे. कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातच कांदाचाळ उभारून कांदा साठवण केली होती. त्यामुळे ओतूर-फापाळे शिवारात सपाट असणाऱ्या सुमारे ५० कांदाचाळीत शेतात पाणी साठल्यामुळे संपूर्ण कांदा भिजला. अती ओलाव्यामुळे काही शेतकऱ्यांच्या कांदाचाळी कलंडल्या व शेतात असलेल्या पाण्यामुळे कांदा सडून नुकसान होणार आहे, असे सरपंच धनंजय डुंबरे म्हणाले.
ओतूर शहर, डोमेवाडी, फापाळे शिवार येथे काही घरे पडली आहेत, असे १५ ते २० जणांनी येऊन सांगितले. (वार्ताहर)