कोरोना संसर्ग आपत्ती निवारणाच्या कामामुळे राज्यभर शिक्षकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 06:40 PM2020-05-14T18:40:57+5:302020-05-14T18:50:23+5:30
कोरोनाच्या संसगापार्सून बचावासाठी पुरेशी साधने नसूनही शिक्षकांनी महिनाभर सलग आपत्ती निवारणाचे काम केले आहे.
बारामती :राज्यभर आपत्ती निवारणाची कामे शिक्षकांना दिली जात आहेत. दुसरीकडे मे महिन्यातही लर्न फ्रॉम होम योजनेअंतर्गत ऑनलाइन शिक्षण द्यावे लागत असल्याने राज्यभर प्राथमिक शिक्षकांमध्ये संताप आहे. कोरोना संसर्गाच्या आपत्ती निवारणाच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
कोरोना संकटामुळे पोलीस व आरोग्य कर्मचारी यांचा ताण कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना आपत्ती निवारणाच्या कामावर जुंपल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. राज्यभरातील शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. शहरात तसेच ग्रामीण भागात आजारी रुग्ण शोधण्याचे तसेच स्थलांतरित लोकांचे लोकांचा शोध घेण्याची काम शिक्षकांना देण्यात आले. हे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक शिक्षकांना रस्त्यावर चेक पोस्टवर तपासणीचे काम देण्यात आले.तर काही ठिकाणी रेशन दुकानावर धान्य वाटप सुरळीत होण्यासाठी शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली, अनेक गावांमध्ये शिक्षकांना पेट्रोल पंपावर निरीक्षणाचे काम देण्यात आले आहे . रात्रंदिवस हे काम करावयाचे असल्याने शिक्षक तणावाखाली असल्याचे चित्र आहे .नुकतेच जत तालुक्यातील डफळापूर गावातील चेक नाक्यावर असलेल्या शिक्षकाला एका ट्रकने चिरडून मारल्याची घटना घडली आहे , भोर तालुक्यातील चेलाडी व मोरवाडी येथील चेक पोस्टवर शिक्षकांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली .त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये संताप असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
शालेय काम विस्कळीत ...
लॉकडाऊनच्या काळात शिक्षण विभागाने शाळा बंद शिक्षण सुरू या योजनेखाली आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे .त्यामुळे दिवसभर शिक्षक व विद्यार्थी व्यस्त आहेत .मात्र आपत्ती निवारणाच्या कामामुळे या योजनेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
———————————————
पडेल ते काम करा...
राज्यभर प्राथमिक शिक्षकांना सर्वेक्षण, चेक पोस्ट ,पेट्रोल पंप, रेशनिंग दुकान, दवाखाने, दारू दुकान यासह पडेल ते काम करा ,असा अघोषित फतवा निघाल्याने अवहेलना होत असल्याची शिक्षकांची भावना आहे.
———————————————————
चेक पोस्टच्या कामात रात्रभर विना सुरक्षा रस्त्यावर थांबावे लागते. कोरोनाच्या संसगापार्सून बचावासाठी पुरेशी साधने नसूनही शिक्षकांनी महिनाभर सलग आपत्ती निवारणाचे काम केले आहे, आता केंद्रीय आरोग्य विभागाच्या निदेशार्नुसार शिक्षकांना विश्रांती देऊन अन्य विभागातील कर्मचारी नियुक्त करावेत.
बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ पुणे
———————————