संतापजनक! नवजात बाळाला रस्त्यालगत फेकले, रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तोंडाला बांधली पिशवी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 09:44 AM2024-12-11T09:44:09+5:302024-12-11T09:44:37+5:30
बाळाच्या तोंडाला पिशवी बांधली असताना रडण्याचा दबका आवाज आजूबाजूच्या लोकांना आला, त्यांनी तातडीने बाळाला पोलिसांच्या ताब्यात दिले
धायरी : नवजात बाळाला रस्त्यालगत सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुकमध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ नये यासाठी त्याच्या तोंडाला पिशवी बांधण्यात आली होती. तरीदेखील बाळाच्या दबक्या आवाजातील रडण्याचा आवाज नागरिकांना आला. त्यांनी बाळाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरी येथील एका इमारतीच्या भिंतीलगत मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका नवजात पुरुष जातीच्या बाळाला कोणीतरी उघड्यावर सोडून दिले. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला प्लास्टिक पिशवी बांधली होती. मात्र, आजूबाजूच्या नागरिकांना लहान बाळाच्या रडण्याचा दबका आवाज आला. त्यांनी शोध घेतल्यावर त्यांना नवजात अर्भक असल्याचे दिसले. आल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्या बाळाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या बालकाची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी, अज्ञात व्यक्तीविरोधात सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवजात बालकाच्या पालकांचा शोधदेखील पोलिस घेत आहेत. दरम्यान, हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने अशा प्रकारचे कृत्य घडले आहे का याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.