उरुळीत कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल ८३ हजार दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 06:05 PM2021-04-25T18:05:12+5:302021-04-25T18:05:48+5:30
पोलीस व ग्रामपंचायत यांच्याकडून ११ दिवसात १६५ जणांवर दंडात्मक कारवाई
उरुळी कांचन :-- उरूळी कांचन परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने पोलीसांनी १६५ जणावर केलेल्या दंडात्मक धडक कारवाईत गेले ११ दिवसांत ८२ हजार ५०० रूपये दंड वसूल केला आहे.
पुणे शहर, उपनगरे, ग्रामीण भागातील मोठी गावे सर्व ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी सकाळी ७ ते ११ या कालावधीत सुरू ठेवण्याबाबत आदेश पारित केले आहेत. नागरिक या आदेशाचे पालन न करता नियमांचे उल्लंघन करण्यात पुढे आहेत. त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करण्यात आली आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाच्या मदतीने उरुळी कांचनपोलिसांनी विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर १२ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान एकुण १६५ दंडात्मक कारवाई करून ८२ हजार ५०० रूपये दंड वसूल केला आहे. १२ ऑगस्ट रोजी उरूळी कांचन परिसरामध्ये कोराना सक्रिय रूग्णसंख्या ११९ अशी होती ती संख्या २२ ऑगस्ट रोजी ८७ अशी झाली असून कोरोना रूग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य या कारवाईमुळे सफल झाले आहे.