भादलवाडीत १०च्या वर डेंगूसदृश आजाराचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:11+5:302021-01-10T04:08:11+5:30

कोरोनाची भीती काही प्रमाणात कमी होताच डेंगू सदृश आजाराच्या कहराला भादलवाडी नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. बदलत्या हवामानामुळे डासांचे ...

Over 10 dengue patients in Bhadalwadi | भादलवाडीत १०च्या वर डेंगूसदृश आजाराचे रुग्ण

भादलवाडीत १०च्या वर डेंगूसदृश आजाराचे रुग्ण

Next

कोरोनाची भीती काही प्रमाणात कमी होताच डेंगू सदृश आजाराच्या कहराला भादलवाडी नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. बदलत्या हवामानामुळे डासांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. तर, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे गावातील पुढारी आणि प्रशासन प्रचारात व्यग्र झाले आहेत. भादलवाडी सारख्या कमी लोकसंख्येच्या गावात १०च्या वर डेंगू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहेत. साथीच्या आजारातील रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक असताना काही खासगी व्यवसाय करणारे डॉक्टर याची माहिती आरोग्य विभागाला देत नसल्यामुळे नेमकी आकडेवारी आरोग्य विभागाकडे मिळू शकली नाही. तर गावात अनेक नागरिक ताप, मळमळ, डोकेदुखी आणि अंगदुखी असल्याच्या तक्रारी खासगी दवाखान्यात घेऊन येत असल्याचे दिसून येत आहे. तर बऱ्याच रुग्णाचे डेंगू आजाराचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने या गावात डेंगूचा उद्रेक झाला असल्याची घोषणा केली. तसेच आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. काही ठिकाणी डासांच्या आळी मिळून आल्याने पाणीसाठे मोकळे करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नागरिक सहकार्य करीत नसल्यामुळे आरोग्य कर्मचारी यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आशा सेविकांनी यावेळी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. गणेश पवार, डॉ. कैलास व्यवहारे, सामुदाय आरोग्य अधिकारी मृदुला जगताप, हेमंत गावित, ग्रामसेवक तुषार लोंढे, पोलीस पाटील तनुजा कुताळ, पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनील वाबळे, आरोग्य सहायक अशोक मोरे, राजेंद्र डोळे, आशा सेविका आणि आरोग्य सेविका यांनी या ठिकाणी भेट दिली.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी सुनील गावडे यांनी भादलवाडी गावाला भेट देत आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेतली. तसेच, तातडीने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्मचारी यांना सूचना केल्या.

याबाबत भादलवाडी गावचे ग्रामसेवक तुषार लोंढे यांनी गावात धूर फवारणी सुरू करून नागरिकांत जनजागृतीसाठी प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. तसेच, नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करीत कोरडा दिवस पाळायच्या सूचना केल्या.

Web Title: Over 10 dengue patients in Bhadalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.