दिवाळीत गावी जाण्यासाठी २०० पेक्षा जास्त वेटिंग; घरी जाणार कसं? रेल्वे फुल्ल अन् प्रवासी नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 03:40 PM2024-09-24T15:40:24+5:302024-09-24T15:40:42+5:30
पुण्यातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या नागपूर, गोरखपूर, दानापूर, झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस व इतर प्रमुख गाड्यांना आतापासूनच वेटिंग सुरू
पुणे : सणासुदीच्या काळात गावी जाण्याची प्रत्येकाला ओढ असते. ऐनवेळी अडचणी येऊ नयेत यासाठी प्रवासी आगाऊ रेल्वे तिकीट बुक करून ठेवतात. त्यात रेल्वेच्या गाड्या या १२० दिवस आधी बुकिंग करण्याची सुविधा आहे. त्यामुळे पुण्यातून जाणाऱ्या जवळपास ८० टक्के गाड्या सध्या ‘वेटिंग’वर आहेत. त्यामुळे आयत्या वेळी जाणाऱ्या प्रवाशांना आता दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नोकरदार, व्यावसायिक व सुटीमुळे गावी जाण्याचे प्रवाशांचे नियोजन कोलमडत आहेत. रेल्वे गाड्यांना आरक्षण मिळत नसल्याने प्रवासी नाराज होत आहेत. यावेळी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना प्रवाशांनी दिवाळीच्या दोन महिने आधीच रेल्वे फुल असल्याने रेल्वे प्रवासी हतबल झाले आहेत. यामुळे दिवाळीला लांब पल्ल्याच्या गावी कशाने जायचे, असा प्रश्न पडत आहे.
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. त्यामुळे गावी जाऊन सण साजरा करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या काळात एसटी, खासगी गाड्या या ‘फुल्ल’ असतात. त्यामुळे प्रवासी रेल्वेचे तिकीट आगाऊ बुक करून ठेवतात. पुण्यातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या नागपूर, गोरखपूर, दानापूर, झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस व इतर प्रमुख गाड्यांना आतापासूनच वेटिंग सुरू झाले आहे. परिणामी, प्रवासात कोणत्याही प्रकारचा त्रास नको असेल, तर आताच इतर पर्याय शोधणे किंवा तिकीट बुक करून ठेवणे हे फायद्याचे ठरेल.
पुण्यातून परराज्यात जाणाऱ्या मार्गावर वेंटिंग
पुण्यातून प्रामुख्याने पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, आंध्र प्रदेश या राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यात बिहार, पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या गाड्यांना बाराही महिने गर्दी असते. त्यामुळे इतर वेळी या गाड्या भरून जातात. काही वेळा गर्दीमुळे या गाड्यांमध्ये चेंगराचेंगरी होते. त्याचा त्रास इतरांना होतो.
या आहेत प्रमुख गाड्या
पुण्यातून बाहेरील राज्यात जाणाऱ्या प्रमुख गाड्या : पुणे-दानापूर, पुणे-हावडा, पुणे-झेलम, पुणे-मंडूवाडी, पुणे-दरभंगा, पुणे-गोरखपूर, पुणे-लखनौ, पुणे-निझामुद्दीन. तर, मुंबईहून पुणेमार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या मुंबई-चेन्नई, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-बंगळुुरू या गाड्यांनासुद्धा सध्या ७० ते ९० पर्यंत वेटिंग आहे.
या गाड्या आहेत वेटिंगवर
- पुणे-दानापूर - १२०
- पुणे-गोरखपूर - १४५
- पुणे-हावडा - २०५
- पुणे-जम्मू तावी - १०८
- पुणे-कन्याकुमारी -४०
- पुणे-हैदराबाद - १०२
- पुणे - नागपूर - २४०
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून पर्याय म्हणून रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. यातूनही गाड्या वेटिंग असतील, तर आणखी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन सुरू आहे. - डॉ.मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक.
परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे रेल्वेला गर्दी जास्त होत आहे. त्यात पुण्यातून नागपूरला जाण्यासाठी ही २०० पेक्षा जास्त वेटिंग दिसत आहे. २७ ऑक्टोबरला पुण्यातून नागपूर जाणे होते. मात्र, जाताना तिकीट मिळाले नाही, तरी येताना तिकीट मिळत आहे. यामुळे दिवाळीला गावी जायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. जाताना तिकीट मिळत नाही. मात्र, येताना तिकीट मिळत आहे. जाताना गाड्या फुल असल्याने आता वेटिंगही दाखवत नाही, यामुळे गावी जाणे अवघड झाले आहे. - उज्ज्वला सांबारे, प्रवासी.