हवामानबदलावर मात
By admin | Published: March 27, 2017 02:13 AM2017-03-27T02:13:23+5:302017-03-27T02:13:23+5:30
बोरीबेल येथील प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण पाचपुते हे आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने शेती न करता नवनवीन प्रयोग करत
अमोल सातव / देऊळगावराजे
बोरीबेल येथील प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण पाचपुते हे आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने शेती न करता नवनवीन प्रयोग करत बाराही महिने कलिंगड,
खरबूज, टोमॅटोसारखी पिके घेतात. सकाळी थंडी आणि दिवसभर कडक उन्हाळा हवामानाच्या या विचित्र लहरीवर मात करीत पाचपुते यांनी जिद्द, चिकाटी, कष्ट आणि अनुभवाद्वारे आपल्या ३ एकरात कलिंगड,
खरबूज पीक जोमाने आणले आहे. परिणामी त्यांनी पावसाळ्यातसुद्धा कलिंगड, खरबूज यासारखी पिके यशस्वीपणे घेत असल्याचे पाचपुते यांनी सांगितले.
दरम्यान, सुरुवातीला त्यांनी आपल्या ३ एकर शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेताची उभी आडवी नांगरणी केली. त्यानंतर शेणखत घातले व उभ्या, आडव्या काकऱ्या घातल्या. शेतामध्ये पाच फुटांपर्यंत बेड तयार केले. त्यावर ड्रिप अंथरून मजुरांच्या साहाय्याने मल्चिंग पेपर त्यावर टाकण्यात आला.
तीन एकरामध्ये कुंदन खरबुजाची अठराशे रोपे लावण्यात आली. त्यानंतर खत व औषधे झाडाच्या गरजेनुसार दिल्याने पाच फुटांपर्यंतचे बेड पूर्ण वेलाने झाकले आहे. परंतु चालू वर्षी हवामान विचित्र असल्याने खरबुजाला औषध फवारणी जास्त कराव्या लागल्या.
कारण दिवसा उष्णता व संध्याकाळी थंड हवामान यामुळे पिकांची वाढ खुटली. मात्र बाळकृष्ण पाचपुते यांनी हवामानाच्या विचित्र लहरीवर मात करीत खरबूज पीक जोमाने पिकवले आहे. एकंदरीत त्यांनी खरबजू, कलिंगड या पिकांवर सातत्याने वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतात घेतल्याने आता या पिकात ते यशस्वी झाले आहेत. परिणामी त्यांच्या शेतातील खरबूज आणि कलिंगडाचा मळा पाहण्यासाठी परिसरातील शेतकरीवर्ग नेहमीच भेट देऊन या पिकाबाबत सविस्तर माहिती घेताना दिसत आहेत.