प्रतिकुल परिस्थितीवर मात करत अनिकेत साठे झाला लेफ्टनंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:13+5:302020-12-22T04:12:13+5:30
पुणे : घरची परिस्थीती बेताची, त्यात वडिलांचे निधन झाले. असे असतांनाही खचून न जाता जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर सुरवातीला ...
पुणे : घरची परिस्थीती बेताची, त्यात वडिलांचे निधन झाले. असे असतांनाही खचून न जाता जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर सुरवातीला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे खडतर तिन वर्ष व त्यानंतर राष्ट्रीय रक्षा अकादमीचे वर्ष भराचे अवघड प्रशिक्षण पुर्ण करून पुण्यातील अनिकेत साठे हा लष्करात लेफ्टनंट म्हणून रूजू झाला. त्याच्या या निवडीने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
अनिकेत अमरेंद्र साठे हा मुळचा पुण्यातील असून तो कोथरूड येथे राहतो. लष्करात अधिकारी होण्याचे त्याचे लहानपहाणापासून स्वप्न होते. त्यासाठी जिद्दीने त्याने अभ्यास केला. मात्र, दरम्यानच्या काळात त्याचे वडील अमरेंद्र साठे यांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असतांनाही न डगमगता त्याने त्यांचा अभ्यास सुरूच ठेवला. शालेय शिक्षण विखे पाटील मेमोरियल स्कूल येथे पूर्ण केले. त्यांनतर महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयातून पूर्ण केले. दरम्यान, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनिची परीक्षा त्याने दिली. २०१६ मध्ये ही अवघड परीक्षा उत्तीर्ण करत त्याने प्रबोधिनीत प्रवेश मिळवला. १३७ व्या तुकडीसाठी त्याची निवड झाली. त्याला पायदळात जायचे असल्याने त्याने भारतीय लष्कराचा पर्याय निवडला. तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण जिद्दीने पूर्ण केले. लष्कराच्या पुढील प्रशिक्षणासाठी २०१९मध्ये डेहराडून येथील राष्ट्रीय रक्षा अकादमीत तो दाखल झाला. प्रबोधिनी प्रमाणेच राष्ट्रीय रक्षा अकादमीचे अवघड प्रशिक्षण त्याने पूर्ण केले. १२ डिसेंबरला राष्ट्रीय रक्षा अकादमीच्या दिक्षांत संचलन सोहळ्यात अंतिम पथ ओलांडून तो लष्करात लेफ्टनंट म्हणून रूजू होणार आहे. अनिकेतच्या आईने त्यांच्या खांद्यावर मानाचे स्टार चढवले. त्याची ही निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.