एका रात्रीत ‘राष्ट्रवादी’ची पुन्हा पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:05+5:302021-08-27T04:15:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवून गुरुवारी सर्वसाधारण सभेपुढे ‘ॲॅमेनिटी स्पेस’ भाड्याने देण्याचा ठराव मांडून तो ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवून गुरुवारी सर्वसाधारण सभेपुढे ‘ॲॅमेनिटी स्पेस’ भाड्याने देण्याचा ठराव मांडून तो बहुमताने महापालिकेत व राज्य सरकार दरबारीही मंजूर होईल, अशी व्यूहरचना सत्ताधारी भाजपने रचली. खासदार ॲॅड. वंदना चव्हाण यांनी भाजपाच्या सुरात सूर मिळवल्याने भाजपाचा डाव यशस्वी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु, चोवीस तासांतच ‘राष्ट्रवादी’ने पुन्हा घूमजाव केला आणि भाजपसोबत केलेली हातमिळवणी संपुष्टात आली.
गुरुवारी (दि. २६) सर्वसाधारण सभेपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ‘ॲमेनिटी स्पेस’ भाड्याने देण्याच्या ठरावाला विरोध कायम असल्याचे ॲॅड. वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीतच माध्यमांसमोर जाहीर केले. ‘राष्ट्रवादी’त रात्रीत घडलेल्या घडामोडींमुळे सत्ताधारी भाजपला ॲॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा ठराव गुंडाळावा लागला. त्यामुळे या विषयासाठीच आयोजित केेलेली शुक्रवारची सर्वसाधारण सभा ८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
“सत्ताधारी भाजपने या ठरावाला दिलेल्या उपसूचना मान्य न केल्याने, आम्ही आमच्या सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ठरावाला विरोध कायम ठेवला आहे,” असे जगताप यांनी पत्रकारांना सांगितले. ॲॅमेनिटी स्पेसच्या विषयावरून प्रारंभी विरोधाची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी सत्ताधारी भाजपला सशर्त पाठिंबा देऊन ‘यू-टर्न’ घेतला होता. त्यानंतर काही वेळातच निवडणूक आयोगाने एकसदस्यीय प्रभागरचना जाहीर केल्याने महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले. परिणामी ऐन निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त विषयावर भाजपशी केलेली हातमिळवणी अंगलट येण्याची शक्यता दिसल्याने, राष्ट्रवादीने पुन्हा भूमिका बदलली अशी चर्चा आहे.