Night Trekking: किल्ल्यावरील चांदण्यारात्रीचा मुक्काम आता विसर गड्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 07:57 PM2022-05-23T19:57:24+5:302022-05-23T19:57:36+5:30
रायगड, राजगड, तोरणा, लोहगड, तिकोणा, हरिश्चंद्रगड या महत्त्वाच्या किल्ल्यांवर रात्रीचा मुक्काम करता येत नाही
गणेश खंडाळे
करोना लॉकडाऊनची बंधनं हटली आहेत. महाराष्ट्रामधील पर्यटन पुन्हा एकदा पूर्वपदावर येत असतानाच किल्ल्यांवर रात्रीच्या मुक्कामाला बंदीच्या बातम्यांनी पर्यटन, ट्रेकिंग जगत ढवळून निघाले आहे. रायगड, राजगड, तोरणा, लोहगड, तिकोणा, हरिश्चंद्रगड या महत्त्वाच्या किल्ल्यांवर रात्रीचा मुक्काम करता येत नाही. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेतच किल्ला पाहता येणार आहे. दुर्गसंवर्धन करणाऱ्या विविध संघटना व पुरातत्त्व खात्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून किल्ल्यांवर दरवाजे बसविण्यात आले आहेत. ते दरवाजे सायंकाळी बंद होतात.
महाराष्ट्रात असणारे किल्ले डोंगरी किल्ले या सदरामध्ये मोडणारे आहेत. डोंगरी किल्ला म्हणजे डोंगररांगेच्या बेलाग कड्यांना तटबंदीचे मुंडासं बांधून किल्ल्याची हद्द निर्माण करण्यात येते. बहुतांश किल्ले हे अवाढव्य क्षेत्रफळाचे आणि दुर्गम आहेत. एका भेटीत किल्ला पाहणं हे अशक्य दिव्य असतं. शासकीय पातळीवर महाराष्ट्रातील पर्यटन वाढविणे गरजेचे आहे असे संकल्प घेतले जातात. आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक वारशातून निर्माण झालेले पर्यटन सरसकट बंदी घालवून त्याच्यातून निर्माण होणाऱ्या आणि एकूणच भटकंतीवर घाव घालणारे निर्णय घातक ठरतात.
रायगडावर रात्रीच्या मुक्कामाबद्दल ज्येष्ठ डोंगर भटके लेखक प्र. के घाणेकर यांनी रायगडावरील रात्रीच्या मुक्कामबंदीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत आता रायगडावर का जायचं, असा उद्विग्न सवाल केला. रायगडावर महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने काही बंगले बांधले आहेत. अनेक वर्षं लोक ते बंगले वापरत आहेत. तीन - साडेतीन वर्ष बंगले बंद आहेत. रायगडाचा विस्तार इतका अवाढव्य आहे की रायगड एका दिवसात पाहणे शक्यच होत नाही. गेले ४० ते ४५ मी रायगड पाहतोय; परंतु म्हणू शकत नाही की रायगड संपूर्ण पाहिला आहे. तिथली मुक्कामाची व्यवस्था बंद करणे हे चुकीचे आहे. मुक्काम कुणी बंद केले, कशासाठी बंद केले. जर त्यातून सरकारला महसूल मिळत आहे. तरी बंद का केले. ही सरकाने केलेली एक प्रकारची मुस्कटदाबीच आहे.
लोक यातूनही पळवाटा काढणार
ज्येष्ठ गिर्यारोहक लेखक व महाॲडव्हेचर कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष वसंत वसंत लिमये यांनी सरसकट बंदीला विरोध केला. मुळात महाराष्ट्रामध्ये डोंगरांच्या माथ्यावर मुक्काम करता येईल, अशी परिस्थिती असणारे नैसर्गिक पर्याय आहे. हिमालय, आल्फ, रॉकी या जगातील मोठ्या डोंगररांगांवर मुक्काम करता येत नाही. कारण तशा मुक्काम योग्य सोयी नाहीत. महाराष्ट्रातील डोंगरांच्या सर्वोच्च शिखरांवर असणाऱ्या किल्ल्यांवर हे करता येते. आता लोक चौकीदाराला, स्थानिकांना चिरीमिरी देऊन यातून पळवाटा काढणार. दुर्गसंवर्धक, ट्रेकर, संघटक मंगेश निरवणे यांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे तर मिलिंद क्षीरसागर (शिवाजी ट्रेल) यांनी मात्र किल्ल्यावर मुक्कामाला बंदी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
किल्ला संवर्धनाच्या दृष्टीने हा निर्णय हितकारकच
किल्ल्यावर मुक्कामबंदी हा किल्ला संवर्धनाच्या दृष्टीने हितकारकच आहे. किल्ल्यावर भेट देणारे सगळेच चांगले नसतात. रात्रीच्या मुक्कामावर बऱ्याच गोष्टी घडतात. किल्ल्याच्या पावित्र्याच्या दृष्टीने गालबोट लागणाऱ्या गोष्टी घडतात. त्यावेळी तेथे लक्ष ठेवणारेदेखील कोणीच नसते शिवदुर्ग मित्र संघटनेचे सुनील गायकवाड यांनी सांगितले.
किल्ल्यावर मुक्काम हा प्रतिबंधित
किल्ल्यावर मुक्काम हा सन १९६० च्या कायद्यानुसार प्रतिबंधित आहे. या कायद्यानुसार किल्ल्यावर कोणालाही अन्न शिजवता येत नाही असे राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी सांगितले.
सरसकट बंदी करणं म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम
किल्ल्याच्या संवर्धनासाठी एकवेळ हा निर्णय मान्य असला तरी सर्वसामान्य भटकणारा ट्रेकर, शिवप्रेमी, इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. या निर्णयावर संबंधित प्रशासन, स्थानिक नागरिक यांनी मध्यम काढणे गरजेचे आहे. सरसकट बंदी करणं म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम असा प्रकार असल्याचे दुर्ग अभ्यासक संदीप तापकीर म्हणाले आहेत. (लेखक पुणे लोकमत आवृत्तीचे उपसंपादक आहेत.)