परदेशी भारतीयांना पुणेरी फराळाचा आस्वाद; पुणे टपाल विभागाकडून खास सोय, पोस्टमनद्वारे पीकअपची व्यवस्था
By श्रीकिशन काळे | Published: October 29, 2023 05:51 PM2023-10-29T17:51:37+5:302023-10-29T17:52:41+5:30
पुण्यातून परदेशात नोकरी निमित्त तसेच शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या अलीकडील काळात खूप वाढली
पुणे : घरापासून दूर परदेशात राहणाऱ्या पुणेकरांना दिवाळीमध्ये फराळा आस्वाद घेता येणार आहे. त्यासाठी खास पुणे टपाल विभागाने इंटरनॅशनल पार्सलची सोय केली आहे. त्यातून परदेशातील नातेवाईकांना फराळ पाठविता येईल. त्यामुळे त्यांना करंजी, लाडू, चिवडा खाता येणार आहे. टपाल विभागातर्फे २५ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे.
पुण्यातून परदेशात नोकरी निमित्त तसेच शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या अलीकडील काळात खूप वाढली आहे. प्रत्येकाला दिवाळी निमित्त भारतात येणे शक्य होत नाही. दिवाळी निमित्त जगभरातील आपल्या प्रिय जणांना फराळ तसेच भेटवस्तू पाठवणे सोपे व्हावे, यासाठी पुणे पोस्ट विभागाने सर्व पोस्ट ऑफिसमध्ये दिवाळी फराळ परदेशात पाठवण्याची सोय केली आहे. पुण्यातील जीपीओ, पुणे शहर मुख्य पोस्ट ऑफिस, चिंचवड ईस्ट, मार्केट यार्ड, शिवाजीनगर, पर्वती, गणेशखिंड, मॉडेल कॉलनी, येरवडा, कोथरूड, डेक्कन, हडपसर येथे पॅकेजिंगची सोय केली आहे, अशी माहिती पुण्याचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली.
ज्यांना आपल्या कामातून वेळ काढून पोस्टात येऊन पार्सल देता येणार नाही, त्यांच्यासाठी खास पोस्टमनद्वारे पार्सल घेण्याची सोय केली आहे. ती देखील मोफत सोय असणार आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत ही सेवा देता येईल. दिवाळीमध्ये फराळ परदेशातील आपल्या प्रियजणांना पाठविला नाही तर अनेकांना वाईट वाटते. त्यामुळे ही विशेष सोय केली आहे. - रामचंद्र जायभाये, पोस्टमास्टर जनरल, पुणे विभाग
२० नोव्हेंबरपर्यंत सेवा
पोस्ट विभागामध्ये २५ ऑक्टोबरपासून ही पार्सल सेवा सुरू केली असून, २० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असून, आतापर्यंत अडीच लाखांचे उत्पन्न पोस्ट विभागाला मिळाले आहे. एक किलो वजनाला चाडेचारशे ते साडेसहाशे रूपये दर आकारण्यात आला आहे. खासगी कुरीअर सेवेमध्ये हजारो रूपये खर्च करून फराळ पाठवावा लागतो.