इच्छुकांकडून ‘व्हॉट्स अॅप’चा अतिरेक
By admin | Published: August 27, 2014 05:27 AM2014-08-27T05:27:41+5:302014-08-27T05:27:41+5:30
पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवू शकतील, असे आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार मोठे फ्लेक्स लावून जाहिरातबाजी करू लागले आहेत
पिंपरी : पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवू शकतील, असे आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार मोठे फ्लेक्स लावून जाहिरातबाजी करू लागले आहेत; परंतु अधिकृत परवानगी घेऊन एखाद-दुसरा फलक लावण्याचीही ज्याची कुवत नाही, अशांनी मोबाईलवरील ‘व्हॉट्स अॅप’ या माध्यमाचा वापर अतिरेकीपणे सुरू केला आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्हॉट्स अॅपवर अधिकाधिक ग्रुप तयार करून वेगवेगळे संदेश, छायाचित्रे पाठवली जात आहेत. या कृत्याने मोबाईलधारक वैतागले आहेत.
विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी,आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांचे ‘व्हॉट्स अॅप’वर ग्रुप तयार करण्यात आले आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या नावे हे ग्रुप असून, त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्तेच ग्रुप अॅडमिन आहेत. मिनिटा-मिनिटाला त्या ग्रुपवर काही तरी संदेश, कॉमेंट, छायाचित्रे धडकू लागली असली, तरी प्रत्यक्ष दूरध्वनी केल्यानंतर मात्र यांपैकी कोणीच भेट घेण्यास सहज उपलब्ध होत नाही. प्रत्यक्ष भेटीसाठी कार्यालयात गेल्यानंतरही साहेब कामात आहेत, असे सांगून ताटकळत ठेवले जाते. विकासकामे केली, जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहोत, असे भासवणारे लवकर भेटतही नाहीत, याबद्दल खेद व्यक्त होत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून परिवर्तन घडू शकते, असा समज झाल्याने स्वत:ची छबी वारंवार व्हॉट्स अॅपवर झळकवून निवडणूक जिंकू शकतो, असा आत्मविश्वास इच्छुक बाळगून आहेत. कामच केले नाही, तर व्हॉट्स अॅपवर छबी झळकावण्याचा उपयोग नाही.(प्रतिनिधी)