म्हाडाच्या घर खरेदीला मोठा प्रतिसाद हे विश्वासाचे द्योतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:46+5:302021-07-03T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या कोरोनाच्या संकटाचा काळ सुरू आहे. या संकटाच्या काळातसुद्धा म्हाडाच्या २ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या कोरोनाच्या संकटाचा काळ सुरू आहे. या संकटाच्या काळातसुद्धा म्हाडाच्या २ हजार ९०८ घरांसाठी ५७ हजार जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. घरांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याचाच अर्थ सामान्य लोकांचा ‘म्हाडा’वर विश्वास आहे. राज्यातील सामान्य जनतेचा हाच विश्वास ‘म्हाडा’ने येत्या काळातही जपावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) २ हजार ९०८ सदनिकांसाठीची ऑनलाईन लॉटरीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत सोडत झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने व नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई, पुण्यासारख्या शहरात आपलंही एक घर असावं असे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकजण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हाडाच्या लॉटरीत घरांसाठी अर्ज करणे हा सुद्धा या प्रयत्नाचाच एक भाग आहे. या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सगळ्यांनाच घर मिळावं, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु आज फक्त २ हजार ९०८ घरं असल्याने तितक्याच जणांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ज्यांचा नंबर लागणार नाही त्यांनी निराश न होता प्रयत्न करत राहिलं पाहिजे. शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागाचाही सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या नव्याने वाढणाऱ्या शहराचा विकास नियोजनबद्ध करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही पवार म्हणाले.
या वेळी उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऑनलाईन लॉटरीतील विजेत्या सदनिकाधारकांना प्रतिनिधिक स्वरूपात त्यांच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.
फोटो :