ओवेसी, आरएसएस एकाच नाण्याच्या बाजू- दिग्विजयसिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:36 AM2018-07-24T00:36:44+5:302018-07-24T00:37:18+5:30
पुढील निवडणूक विचारधारेवर; धार्मिक उन्माद पसरवल्याचा आरोप
पुणे : ओवेसी मुस्लिमांमध्ये धार्मिक उन्माद पसरवण्याचा प्रयत्न करीत असतात. तोच प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत असतो. पुढील निवडणूक व्यक्तिकेंद्रित नसेल, तर विचारधारेवर लढवली जाईल. महात्मा गांधी की हेडगेवार, गोळवलकर? यातून निवड करावी लागेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केले.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शन घेऊन आल्यानंतर पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिग्विजयसिंह यांनी काँग्रेस, भाजपा, केंद्र सरकार व अन्य विविध मुद्द्यांवर भाष्य केले. देशात धार्मिक उन्माद पसरवला जात आहे, असा आरोप करून ते म्हणाले, ‘‘शशी थरूर यांनी ‘हिंदू पाकिस्तान’ शब्द वापरला तो बरोबर आहे. तिथे ज्याप्रमाणे धार्मिक भावना भडकावण्याचे काम सुरू आहे तसेच इथेही करण्याचा प्रयत्न आहे. मी हिंदू आहे; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संंघाला हिंदूंची संघटना मानत नाही. माझा अहिंसवेर विश्वास आहे. देशालाही अहिंसाच मान्य आहे.’’
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेल्या मिठीचे दिग्विजयसिंह यांनी समर्थन केले. यापूर्वीही संसद सदस्य अशी भेट घेत होते, हस्तांदोलन करीत होते, असे ते म्हणाले. राहुल त्यांची नवी टीम तयार करीत आहेत. अशी टीम त्यांनी तयार करावी, असे आपणच त्यांना सुचवले होते, असे ते म्हणाले.