मालकी बोरीपार्धीची परंतु नाव केडगावचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:14+5:302021-03-28T04:10:14+5:30
केडगाव : बोरीपार्धी तालुका दौंड येथील शासकीय व ऐतिहासिक वास्तू बोरीपार्धी हद्दीमध्ये येतात परंतु या ठिकाणांना केडगावचे नाव लागले ...
केडगाव : बोरीपार्धी तालुका दौंड येथील शासकीय व ऐतिहासिक वास्तू बोरीपार्धी हद्दीमध्ये येतात परंतु या ठिकाणांना केडगावचे नाव लागले आहे. त्यामुळे ही ठिकाणे म्हणजे मालकी बोरीपार्धीची परंतु नाव केडगावचे अशी अवस्था होऊन बसली आहे.
तालुक्यातील सर्वाधिक मोठी समजली जाणारी केडगाव बाजारपेठ निम्मी बोरीपार्धी ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. एक किलोमीटर लांब असणाऱ्या या बाजारपेठेमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. तालुक्यातील ३२ गावांना जोडणारा नाका म्हणून या बाजारपेठेकडे पाहिले जाते. जवळपास अर्धा किलोमीटर बाजारपेठेतील लवंगरे हॉस्पिटल ते मारुती मंदिर चौक या हद्दीतील दुकाने बोरीपार्धीच्या हद्दीमध्ये येतात. ऐतिहासिक व धार्मिक वारसा असणारे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन हे बोरीपार्धीच्या हद्दीमध्ये येते, परंतु या मिशनला पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केडगाव असे संबोधले जाते. पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन केडगाव हे जवळपास संपूर्ण बोरीपार्धी हद्दीमध्ये येते परंतु या स्टेशनला केडगाव रेल्वे स्टेशन म्हणून संबोधले जाते. सहायक निबंधक कार्यालय केडगाव, पोस्ट कार्यालय केडगाव, टेलिफोन कार्यालय केडगाव, खरेदी-विक्री संघ केडगाव, गुरांचा दवाखाना केडगाव, बँक ऑफ महाराष्ट्र केडगाव ही सर्व महत्त्वाची शासकीय व सरकारी कार्यालये ही बोरीपार्धी हद्दीमध्ये येतात. परंतु या सर्व ठिकाणांच्या समोर केडगाव असे लिहिले जाते. या संदर्भात बोरीपार्धीचे सरपंच सुनील सोडनवर म्हणाले की, सदर ठिकाणांचे रजिस्ट्रेरेशन केडगाव नावाने असल्याने सदर ठिकाणे बोरिपार्धी हद्दीमध्ये असूनही त्यांच्या नावासमोर केडगाव नाव लागले आहे. ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच लक्ष्मण थोरात, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी यासंदर्भात सुरुवातीस पाठपुरावा केला होता. मधल्या काळामध्ये विषय रेंगाळला. भविष्यामध्ये बोरीपार्धी ग्रामपंचायतीचा प्रथम नागरिक म्हणून, अपवाद वगळता या ऐतिहासिक व शासकीय वास्तूंच्या समोर केडगावऐवजी बोरीपार्धी नाव लागण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. यासंदर्भात संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार केला जाईल.
फोटो- बोरीपार्धी हद्दीमध्ये येत असलेल्या रेल्वे स्टेशनला केडगाव रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात आले. (छायाचित्र प्रकाश शेलार)