सांगवीत कामगारानेच मालकाचा खून केल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 03:35 PM2018-03-20T15:35:07+5:302018-03-20T15:35:07+5:30
सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळयात पडलेला आढळून आला होता.
पिंपरी : सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळयात पडलेला आढळून होता. हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कैलास तौर या फॅब्रिकेशन व्यावसायिकाने त्याच्या वर्क्सशॉपमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या पत्नीवर अतिप्रसंग केल्याने कामगाराने रागाच्या भरात मालकाला मारहाण केली. या मारहाणीत तौर याचे डोके भिंतीवर आपटले, त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शिरीष वर्मा (वय ३३,रा.पिंपळे निलख) या आरोपीला खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फॅब्रिकेशन व्यवसाय असलेल्या तौर याने पत्नी,मुले यांना गावी सोडले. मूळ गाव गेवराई जिल्हा बीड येथे पत्नी व मुलांना सोडून आल्यानंतर तौर सांगवी समर्थनगर येथील घरी एकटेच होते. त्यांनी रविवारी रात्री त्यांच्याबरोबर काम करणारा कामगार शिरिष वर्मा याला कु टुंबासह जेवणासाठी घरी बोलावले. रात्री तौर यांच्या घरी पार्टी झाली. मद्यप्राशन,जेवण केल्यानंतर सर्वांनी तौर यांच्या घरीच झोपण्याचे ठरविले. वर्मा पत्नीसह तौर यांच्या घरी मुक्कामी थांबले. रात्री तौर यांनी वर्मा यांच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. पत्नीचा आरडाओरडा ऐकु आल्याने वर्मा यांना जाग आली. रागाच्या भरात वर्मा याने तौर यांना मारहाण केली. तसेच त्यांचे डोके भिंतीवर आदळले.जबरी मार लागल्याने तौर तेथेच कोसळले. तौर यास रक्ताच्या थारोळ्यात आहे तसेच ठेऊन वर्मा पत्नीला घेऊन रात्रीच तौर याच्या घरातून बाहेर पडले.सकाळी नेहमीप्रमाणे फॅब्रिकेशन वर्कशॉपवर एक कामगार आला. वर्क्सशॉप खुले नसल्याने तो मालक तौर राहत असलेल्या ठिकाणी त्यांच्या घरी गेला. त्यावेळी ही बाब त्याच्या निदर्शनास आली. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी वर्मा तसेच त्याच्या पत्नीकडे सखोल चौकशी केली, त्यावेळी वर्मा याने खुनाची कबुली दिली.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ननावरे, अलका सगर, फौजदार मधुमती शिंदे, शिरिष राऊत,शंकर जाधव, सुरेश खांडेकर, रोहिदास बोहले, नितीन दांगडे, कैलास केंगळे, दिपक भिसे यांच्या पथकाने आरोपीला २४ तासाच्या आत जेरबंद केले.