पुण्यात स्पामध्ये वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या मालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 10:55 IST2022-04-26T10:53:19+5:302022-04-26T10:55:07+5:30
मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता..

पुण्यात स्पामध्ये वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या मालकाला अटक
पुणे : बाणेर येथील औरा थाय स्पा या मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या स्पा मालकाला सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली. मनीष सुरेशचंद्र मुथा (वय ४०, रा. ईशापर्ल साेसायटी, कोंढवा खुर्द) असे या स्पा मालकाचे नाव आहे.
बाणेर येथील औरा स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाल्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने १२ एप्रिल रोजी छापा टाकून तेथे कारवाई केली होती. यावेळी थायलंड येथील ४, तर मेझोराम येथील २ अशा ६ महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी स्पाच्या मॅनेजर सागर पवार याला अटक केली आहे. त्याच्याकडून ८१ हजार ८९० रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच स्पा मालक मनीष मुथा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मनीष मुथा याचा शोध घेतला असताना तो जीएसटी कार्यालयाने एका गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून त्याला अटक करण्याची मंजूर घेतली. त्याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, राजश्री मोहिते, इरफान पठाण यांनी ही कारवाई केली.