कुत्र्याच्या मृत्यू प्रकरणी केअर टेकरच्या विरोधात मालकाची तक्रार; लोणावळ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 11:00 AM2020-09-22T11:00:38+5:302020-09-22T11:01:00+5:30
पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पडून कुत्र्याचा मृत्यू...
लोणावळा : सहा वर्षाचा कुत्रा मृत्यू पावल्याप्रकरणी बंगला मालकाने केअर टेकरच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी घडली आहे.
आयेषा समिर वशी (वय ४९, युनियन पार्क, खार वेस्ट मुंबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आयेषा वशी याचा तुंगार्ली येथील डीन विला सोसायटीमध्ये बंगला आहे. वशी ह्या कलाकार असून विविध भाषिक सिनेमामध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी सहा वर्षांपुुर्वी बं गल्यावर दोन कुत्र्याची पिल्ले आणून ठेवली होती. त्याचा केअर टेकर राम आंद्रे हे या कुत्र्याची देखभाल करत असे. १३ सप्टेंबर रोजी आंद्रे यांनी वशी यांना फोन करून सांगितले की, त्यांनी सांभाळायला दिलेल्या दोन कुत्र्यांपैकी रकी नावाचा कुत्रा हा पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पडून मृत्यू झाला आहे. मात्र कुत्र्याच्या नाका तोंडातून कानातून रक्त येत असल्याने वशी यांनी पशू वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील डाॅ. गायकवाड व डाॅ. मेश्राम यांना सांगितल्यानंतर ह्या कुत्र्याचे शवविच्छेदन केले असता त्याचा मृत्यू श्वास गुदमरून झाला असल्याचे स्पष्ट झाले. यावरून वशी यांनी केअर टेकर आंद्रे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर कुत्र्याला आंद्रे यांनीच मारले असल्याच्या संशयावरून वशी यांनी त्याच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार आंद्रे यांच्यावर भादंवि कलम ४२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा तपास सुरू आहे.