कुत्र्याने रस्त्यावर घाण केल्याने मालकाला दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 02:42 AM2018-12-18T02:42:41+5:302018-12-18T02:43:06+5:30
कल्याणीनगरमध्ये महापालिकेतर्फे कारवाई
कल्याणीनगर : कल्याणीनगर मधील एका पाळीव कुत्र्याने रस्त्यावर शौच केल्याप्रकरणी त्याच्या मालकाकडून पाचशे रुपये दंड केला. नगररोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा दंड वसूल केला.
कल्याणीनगर, विमाननगर आणि खराडी भागामध्ये मोठ्या प्रमाणात उच्चभ्र सोसायट्या आहेत. या सोसायट्यांतील नागरिक आपल्या पाळीव कुत्र्यास सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर फिरण्यासाठी आणतात. या वेळी अनेकदा पाळीव श्वान फुटपाथवर घाण करतात. नागरिक कुत्र्याची घाण स्वच्छ करीत नाही. यामुळे या भागातील काही फुटपाथवरून चालणे अवघड होत आहे. तसेच, पाळीव प्राणी रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करतात. यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी परसते, तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यामुळे रस्त्यावर घाण करणाºयांवर पाळीव प्राण्याच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे धोरण पालिकने तयार केले आहे. या धोरणानुसार पाळीव प्राण्याने रस्त्यावर घाण केल्यास मालकाकडून पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे. पाळीव प्राण्यांना फिरायला घेऊन येणाºयांसोबत पूप स्कूपर सोबत ठेवावे अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. पालिकेने कुत्र्यांच्या विरोधात मोहीम सुरू केल्याने फुटपाथ स्वच्छ राहतील, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
कारवाई सातत्याने होणार
नगररोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य अधिकारी मुकुंद गम यांनी सांगितले की, रस्त्यावर कुत्र्याने घाण केल्यास मालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. पालिकेच्या वतीने कल्याणीनगर भागातील दोन ठिकाणी पूप स्कूपर डस्टबिन ठेवण्यात आले आहे. कल्याणीनगर मधील काही सोसायट्यांनी त्यांच्या परिसरामध्ये पूप स्कूपर डस्टबिन ठेवले आहे.