बंद पडलेल्या थेऊरच्या 'यशवंत' कारखान्यातून होऊ शकते ऑक्सिजननिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:18 AM2021-05-05T04:18:19+5:302021-05-05T04:18:19+5:30

* मिळू शकते सभासद व सभासदांच्या कुटुंबीयांना जीवनदान! उरुळी कांचन : ऑक्सिजनच्या आणीबाणीच्या काळात थेऊर (ता. हवेली) ...

Oxygen can be produced from the closed Theur's 'Yashwant' factory | बंद पडलेल्या थेऊरच्या 'यशवंत' कारखान्यातून होऊ शकते ऑक्सिजननिर्मिती

बंद पडलेल्या थेऊरच्या 'यशवंत' कारखान्यातून होऊ शकते ऑक्सिजननिर्मिती

Next

* मिळू शकते सभासद व सभासदांच्या कुटुंबीयांना जीवनदान!

उरुळी कांचन : ऑक्सिजनच्या आणीबाणीच्या काळात थेऊर (ता. हवेली) यशवंत कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीसाठी चाचपणी करून अत्यावश्यक गरजेसाठी ऑक्सिजन तयार करुन कारखान्याला जीवदान देऊन मदतीची सांगड घालावी, अशी मागणी सभासदांमधून होत आहे.

कोरोना महामारीत रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनचा (प्राणवायू) प्रचंड तुटवडा जाणवत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येला पुरेल असा प्राणवायू सध्या राज्यामध्ये उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी प्राणवायूची वाट पाहावी लागते व तो मिळाला नाही तर जिवाला मुकावे लागत आहे, अशी स्थिती असताना राज्यकर्त्यांनी त्यांच्या हाताशी असलेले वेगवेगळे प्रकल्प, साखर कारखाने, प्राणवायू निर्मिती कारखाने जे काही कारणाने बंद पडले आहेत, ते चालू करण्याची चाचपणी करून या महाभयंकर संकटात सर्वांच्या मदतीने अत्यंत गरजेचा असलेला प्राणवायू निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही सहकारी साखर कारखान्यांंनी उपपदार्थ उत्पादनासाठी उभ्या केलेल्या प्रकल्पांत बदल करुन ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यात विविध खाजगी, शासकीय रुग्णालयांत दाखल कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रशासनाला प्रतिदिन ३५० ते ३७० टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. तर राज्याला २००० टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. जिल्ह्याला सातारा , रायगड येथून ऑक्सिजन पुरवठा करावा लागत आहे. तरीही ऑक्सिजनचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर पर्याय म्हणून सहकारी साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या प्रकल्पात काही बदल करून ऑक्सिजनचे उत्पादन घेण्याचे प्रयत्न चालू केले आहे. परंतु ऑक्सिजन उत्पादन स्त्रोताची गरज म्हणून ११ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्लॅंटचा पर्याय म्हणून उपयोग होऊ शकतो. .

कारखान्याकडे ३० के.एल.पी.डी. क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प आहे. या प्रकल्पात बदल घडवून ऑक्सिजनची निर्मिती व साठा प्रकल्प सुरू होईल का याची चाचपणी करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हवेतील ऑक्सिजन खेचून हवेतील कार्बन डायऑक्साईड वेगळा करुन ऑक्सिजन तयार होऊ शकतो? का अशी चाचपणी पण महत्त्वाची ठरणार आहे. हा ऑक्सिजन उत्पादन करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला तर जिल्ह्याची मोठी मागणी पूर्ण होणार आहे. अलीकडे या बंद अवस्थेतील कारखान्यातून साखरे ऐवजी इथेनॉलचे उत्पादन घ्यावे म्हणून आमदार अशोक पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी केली होती. अशाच प्रकारे ऑक्सिजन निर्मितीस प्रयत्न दाखविल्यास 'यशवंत 'ला न्याय मिळू शकतो, अशी सभासदांची भावना आहे.

Web Title: Oxygen can be produced from the closed Theur's 'Yashwant' factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.