Oxygen Crisis Pune : महापालिकेची ऑक्सिजनबाबत 'आत्मनिर्भरते'कडे वाटचाल; १२ ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 07:31 PM2021-05-15T19:31:12+5:302021-05-15T19:31:42+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात पालिकेला ऑक्सिजन मिळवतानाही नाकी नऊ आले.
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात पालिकेला ऑक्सिजन मिळवतानाही नाकी नऊ आले. ऑक्सिजन प्लांटची आवश्यकता लक्षता घेऊन पालिकेने सीएसआर तसेच अन्य मदतीमधून ऑक्सिजन प्लांट उभारण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात दोन प्रकल्प सुरु झाले असून लवकरच ही संख्या १२ पर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
रुग्णसंख्या कमी होत असली तरी गंभीर रुग्णसंख्या अजूनही घटलेली नाही. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून पालिकेने ऑक्सिजन निर्मितीवर भर दिला आहे. पालिकेच्या नियोजनात असलेल्या बारा प्रकल्पामधून १०,५८३ लिटर/प्रति मिनिट ऑक्सिजन तयार होणार आहे. मोहोळ म्हणाले, शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. ऑक्सिजनचे नियोजन करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे मध्यम आणि मोठ्या मनपाचे हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालिकेमार्फत ८ हॉस्पिटलमध्ये १२ प्लांट बसविण्यात येत आहेत. यापैकी काही प्लांट अमेरिका, फ्रांस आणि नेदरलँडवरून मागविण्यात येत आहेत. तर काही प्लांट झिओलाईट व इतर काही महत्वाचे अवयव (पार्ट) आयात करून भारतामध्ये बनविण्यात येणार आहेत. पालिकेकडे सध्या ४० टन लिक्विड ऑक्सिजनचा साठा करण्यासाठी एकूण ७ टँक बसविण्यात आल्याचे महापौर म्हणाले.