ऑक्सिजनअभावी डॉक्टर्स, नातेवाईक हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:10+5:302021-04-22T04:11:10+5:30
कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याप्रमाणे यंत्रणांवरील ताणदेखील वाढत आहे. त्यात या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा कमी पडू लागल्या ...
कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याप्रमाणे यंत्रणांवरील ताणदेखील वाढत आहे. त्यात या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा कमी पडू लागल्या आहेत. ॲाक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या ॲाक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णालयांवर कोरोना रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची वेळ आली होती. मात्र, अडचण असतानाही ऑक्सिजन मिळत नसल्याने आता रुग्णालयांनी कोरोना रुग्ण दाखल करून घेणे थांबविले आहे.
ऑक्सिजनअभावी रुग्णांचे व्यवस्थापन करण्यास अडचण निर्माण झाली आहे. वारंवार मागणी करूनही ऑक्सिजन सप्लायरकडून संध्याकाळी सहानंतर सप्लाय करणे बंद होते. त्यामुळे पुरवठा कमी पडत आहे, असे डीलरने सांगितले. ऑक्सिजन बनण्यासाठी आवश्यक लिक्विड मिळत नसल्याने ऑक्सिजनचे सिलिंडर मिळत नाही, असे एम्स हॉस्पिटल औंध येथील ऑक्सिजन पुरवठादार भंडारे यांनी सांगितले.
या वेळी एम्स हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर गोकुळ गायकवाड म्हणाले, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने उपचार करणे अवघड होत आहे. यामुळे पेशंट दुसरीकडे पाठविण्याची वेळ येऊ शकते. डॉक्टर कोरोना विरुद्ध लढत असताना त्यांना औषधे व ऑक्सिजनचा पुरवठा करणे याकडेच सरकारने प्राधान्य दिले पाहिजे.
ऑक्सिजन पुरवठा सुरळीत न झाल्यास औंध परिसरातील रुग्णांच्या जीवावर बेतू शकते, याचा विचार करून सर्वच हॉस्पिटलला आवश्यक ऑक्सिजन पुरवठा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.