ऑक्सिजनचं संकट दूर करण्यासाठी हवाई दल मदतीला आले; ४ टँकरसह पुण्याहून गुजरातकडे रवाना झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:03 PM2021-04-24T23:03:35+5:302021-04-24T23:49:52+5:30
जाताना हवाई मार्गे तर येताना 'बाय रोड'
पुणे : मागील दोन आठवड्यांपासून पुण्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. प्रशासनाच्या प्रयत्नानंतरही हा पुरवठा सुरळीत झालेला नाही. ऑक्सिजनची ही कमतरता भरून काढण्याकरिता थेट भारतीय हवाई दलाच्या मदतीचा हात पुढे केला आहे. हवाई दलाच्या विमानाने ऑक्सिजनचे चार रिकामे टँकर गुजरातमधील जामनगर येथे रवाना झाले. या टँकरमधून पुण्यासाठी ऑक्सिजन आणला जाणार असल्याची माहिती संरक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
देशभरातच लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठी हवाई दल प्रयत्न करीत आहे. ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वेचीही मदत घेण्यात येत आहे. परंतु, रस्ते आणि लोहमार्गाने ऑक्सिजन पोचण्यास उशीर लागत आहे. त्यामुळे हवाई दलाने मदतीचा हात पुढे केला आहे. कमी वेळात ऑक्सिजन पुरविण्यासाठी विमानाने वाहतुकीचा प्रयत्न केला जात आहे.
हवाई दलाचे सी-१७ विमान शनिवारी सकाळी दहा वाजता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावरून पुण्यात दाखल झाले. या विमानात दोन रिकामे क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर चढविण्यात आले. पुणे विमानतळावरून हे विमान जामनगरला रवाना झाले. हे दोन टँकर जामनगरला पोचवून हे विमान पुन्हा पुण्यात आले. दुसरी फेरी करून आणखी दोन ऑक्सिजन टँकर जामनगरला पोहोचविण्यात आले.
-----
लडाखच्या दुर्गम भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने विकसित केले साहित्य हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टर आणि एएन ३२ मालवाहतूक विमानातून पोचविण्यात आले. जम्मूमधून लेह आणि कारगिलसाठी बायो सेफ्टी कॅबिनेट्स, सेंट्रिफ्युजेस आणि स्टॅबिलायजर्स असे कोरोना चाचणीचे साहित्य पोहोचविण्यात आले. यासोबतच हवाई दलाच्या सी-१७ विमानाने पहाटे दोन वाजता हिंडन विमानतळावरून सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चार ऑक्सिजन कंटेनर आणण्यात आले. हे कंटेनर पश्चिम बंगालमधील पानागढ हवाई तळावर उतरविण्यात आले.