दोन आठवड्यांत साकारला ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:29+5:302021-05-06T04:11:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनारुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनचा विस्कळीत पुरवठा लक्षात घेता, पुणे महापालिकेने अवघ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनारुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनचा विस्कळीत पुरवठा लक्षात घेता, पुणे महापालिकेने अवघ्या दोन आठवड्यांत ‘ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट’ दळवी हॉस्पिटलमध्ये साकारला असून या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीलाही सुरुवात झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
दळवी हॉस्पिटलमध्ये साकारलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते बुधवारी केले. यावेळी विभागीय आयुक्त सौरव राव, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, कुणाल खेमणार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ऑक्सिजन मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा सध्या होत नाही. महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये १३० ऑक्सिजन बेड्स आहेत. सद्यस्थितीत या हॉस्पिटलमध्ये २२०० किलो प्रतिदिन (१२ ते १५ यूरा सिलिन्डर्स ) प्रमाणे ऑक्सिजनचा वापर आहे. सद्य:स्थितीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झालेली असल्याने ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्टसारखी पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता निर्माण झालेली होती, म्हणूनच आपण अवघ्या दोन आठवड्यांत हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला आहे.
दळवी हॉस्पिटलमध्ये प्रति बेड १० लिटर प्रति मिनिटनुसार सुमारे १७०० लिटर प्रतिमिनीट ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्टची आवश्यक होती. म्हणूनच आपण ८५९ लिटर/मिनीटप्रमाणे दोन ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट्स बसविणे. तसेच बॅकपसाठी एक अतिरिक्त कॉम्प्रेसर, सिस्टीमपर्यंतचे पाईपिंग, विद्युत विषयक कामे या सर्व बाबी करुन घेतल्या आहेत. यामध्ये १ वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. तसेच मनपा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा समावेश आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून सदर कंपनीने कमीतकमी ३ महिने प्रकल्प चालवणार आहे, असेही मोहोळ यांनी सांगितले.
--
महापालिका आणखी ७ ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट उभारणार
पुणे मनपा हद्दीत आपण आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करत असताना, शहरात आणखी ७ ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट साकारणार आहेत. दळवी हॉस्पिटलसह नायडू, नवीन आणि जुने बाणेर हॉस्पिटल येथे हे प्रकल्प उभारत आहोत, असेही यावेळी महापौर मोहोळ यांनी सांगितले.
------
फोटो मेल केला आहे.