मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट, पुण्यात 15 दिवसांत कार्यान्वित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:21+5:302021-05-21T04:11:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार आता मध्य रेल्वे आपल्या सर्व विभागातील विभागीय रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लान्ट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार आता मध्य रेल्वे आपल्या सर्व विभागातील विभागीय रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लान्ट सुरू करणार आहे. यात पुणे, सोलापूर, नागपूर, मुंबई येथील हॉस्पिटलचा समावेश आहे. भुसावळमध्ये या पूर्वीच ऑक्सिजन प्लांट सुरू झाला, तर पुण्यात येत्या १५ दिवसांत प्लांट कार्यान्वित होणार आहे. गुरुवारी या संदर्भात वर्क ऑर्डर निघाला आहे.
रेल्वे बोर्ड ने देशात ८६ ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी 4 कार्यान्वित झाले आहेत. 52 प्लांटला मंजुरी देण्यात आली, तर उर्वरित 30 ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने ऑक्सिजन प्लांट सुरु करण्याबरोबरच कोविड बेडची संख्या वाढविण्याचे काम केले. कोविड बेडची संख्या पूर्वी 2539 इतकी होती, ती आता 6972 इतकी झाली. तर व्हेंटिलेटरची संख्या पूर्वी 62 होती ती आता 296 इतकी करण्यात आली. ऑक्सिजन प्लांटसाठी प्रत्येक झोनच्या सरव्यवस्थापक यांना 2 कोटी रुपयांचे अधिकार देण्यात आले. यामुळे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम वेगाने होईल.
पुण्याला सुरू होणारा प्लांटची क्षमता ही मिनिटाला 250 लिटरची असणार आहे. तर सोलापूरला सुरू होणाऱ्या प्लांटची क्षमता मिनिटाला 240 लिटर ऑक्सिजन तयार करण्याची असेल. एक प्लांट तयार करण्यास किमान 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
----------------------
मध्य रेल्वेच्या सर्वच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू होणार आहे. हे काम गतीने व्हावे या करिता प्रयत्न सुरू आहे. यासाठी सर व्यवस्थापक यांना विशेष अधिकारसुद्धा देण्यात आले आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई