Oxygen Plant Pune : पुणे महापालिकेच्या तीन ऑक्सिजन प्लांटमधून मिळणार 'प्राणवायू'; आणखी ७ उभे करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:55 PM2021-05-08T18:55:03+5:302021-05-08T18:55:36+5:30
आतापर्यंत तीन प्लांट उभे राहिले असून यामधून ३ हजार लिटर प्रति मिनिट अशी ऑक्सिजन निर्मिती होऊ लागली आहे.
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील आरोग्य व्यवस्थेला मोठा तडाखा बसला. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून होत गेलेल्या रुग्णवाढीमुळे शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या खाटांची मागणी वाढली. याच काळात ऑक्सिजन कमी पडू लागल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले होते. या समस्येवर उपाय म्हणून पालिकेने खासगी संस्था, कंपन्या, बँका आदींच्या मदतीमधून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तीन प्लांट उभे राहिले असून यामधून ३ हजार लिटर प्रति मिनिट अशी ऑक्सिजन निर्मिती होऊ लागली आहे.
शहरातील एकूणच रुग्णसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजच्या खाटाही मिळविणे अवघड झाले. नातेवाईकांची खाटांसाठी धावपळ सुरू होती. काही रुग्णालयांनी तर रुग्णांच्याच नातेवाईकांना बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर आणण्यास भाग पाडले. याच काळात रेमडेसिविरचाही तुटवडा निर्माण झाला. ऑक्सिजनची वाढती आवश्यकता लक्षात घेता परराज्यातून आयात करण्यास सुरुवात करण्यात आली.
जम्बो कोविड सेंटर, बाणेर कोविड सेंटरसह सर्व कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कमी पडू लागला. जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बचतीचा वेगळा प्रयोगही करण्यात आला. हा प्रयोग अन्य रुग्णालयातही राबविण्यात आला असून दिवसाला १० टन ऑक्सिजनची बचत केली जात आहे.
पालिकेला स्वतःच्या रुग्णालयात तरी ऑक्सिजन प्लांट असावेत अशी आवश्यकता भासू लागली. त्यामुळे काही संस्थांच्या मदतीने हे प्लान्ट उभारण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारण्यात आला. तर, काही ठिकाणी पालिकेने खर्च केला. पालिकेच्या मुरलीधर लायगुडे दवाखाना, दळवी रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि बाणेर जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात प्लान्ट उभारण्यात आले आहेत. यातील, लायगुडे, दळवी आणि नायडूमधील प्लान्ट सुरू झाले आहेत. तर, बाणेर येथील प्लांटचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर, खेडेकर, बाणेर, वारजे, नायडू आणि इंदिरानगर येथील रुग्णालयांमध्येही आणखी सहा प्रकल्प प्रस्तावित आहेत.
--///--
ऑक्सिजन निर्मिती सुरू झालेले
रुग्णालय। क्षमता (लिटर प्रति मिनिट) । खर्च
मुरलीधर लायगुडे। ३००। ५० लाख
दळवी रुग्णालय। १७००। २ कोटी १० लाख
नायडू रुग्णालय। ८५०। १ कोटी ५० लाख
बाणेर जम्बो सेंटर। २४ टन। १ कोटी ३० लाख (कामाची ऑर्डर दिली)
------
नियोजनात असलेले प्लान्ट
रुग्णालय। क्षमता (लिटर प्रति मिनिट) । खर्च
खेडेकर। ६००। ८० लाख
बाणेर (नवीन) । १०००। १ कोटी ५० लाख
बाणेर जम्बो सेंटर। २०००। ३ कोटी
वारजे। ८५०। १ कोटी ५० लाख
नायडू। ८५०। १ कोटी ५० लाख
इंदिरानगर। ८५०। १ कोटी ५० लाख
-----