पुणे महापालिकेने दळवी रुग्णालयात उभारावा 'ऑक्सिजन'निर्मिती प्रकल्प: भाजप नेत्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 08:30 PM2021-04-17T20:30:57+5:302021-04-17T20:31:43+5:30

कोरोना संकट काळात ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा दगावू नये यासाठी पालिकेने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

Oxygen production project to be set up by Pune Municipal Corporation in the premises of Dalvi Hospital: Demand of BJP leader | पुणे महापालिकेने दळवी रुग्णालयात उभारावा 'ऑक्सिजन'निर्मिती प्रकल्प: भाजप नेत्याची मागणी

पुणे महापालिकेने दळवी रुग्णालयात उभारावा 'ऑक्सिजन'निर्मिती प्रकल्प: भाजप नेत्याची मागणी

Next

पुणे: कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येत भरच पडते आहे. याचवेळी शहरात  ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरु आहे. आता पुणे महापालिकेने दळवी हॉस्पिटल येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे, आणि पिंपरीतील जम्बो कोविड सेंटर, ससून तसेच खासगी हॉस्पिटमध्ये उपचारांसाठी बेड्स उपलब्ध होणे कठीण झाले आहे.तसेच रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा हळूहळू कमी पडू लागला आहे. पुण्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध यंत्रणा चोहोबाजूंनी प्रयत्नशील आहेत. ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा दगावू नये यासाठी पालिकेने पावले उचलण्याची गरज असल्याचे बिडकर यांनी स्पष्ट केले. 

पालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये १७० बेड्स आहेत. त्यापैकी १३० ऑक्सिजन बेड्स आहेत तर उर्वरित ४० सर्वसाधारण बेड्स आहेत. सद्यस्थितीला प्रतिदिन  २२०० किलो (१२ ते १५ ड्युरा सिलिंडर) या प्रमाणे येथे ऑक्सिजनचा वापर होतो. तसेच बॅक अप म्हणून १६ बाय १६ जंबो सिलिंडरची पर्यायी व्यवस्था येथे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिल्याचे बिडकर यांनी सांगितले. ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत असल्याने रुग्णांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी दळवी हॉस्पिटल येथे ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सभागृह नेते बिडकर यांनी केली. यासाठी लागणारा खर्च हा भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाच्या विकास निधीतून देण्याची तयारी असल्याचे बिडकर यांनी पालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

शहरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याने महापालिकेच्या दळवी रुग्णालयात प्रशासनाने ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्रकल्प उभारावा. यासाठी पालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व सभासदांच्या वार्डस्तरीय निधीतून प्रत्येकी दोन लाख २० रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी आहे असेही सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले.
..........
'सेक्युरिस्क मल्टीपल सोल्युशन' या कंपनीने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव देखील या कंपनीने पालिका प्रशासनाकडे सादर केला आहे.  ८५९ लिटरचे दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारणे, बॅकअप साठी अतिरिक्त कॉम्प्रेसर तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेपर्यंत पाईपिंग, विद्युत तसेच इतर कामे करणे यासाठी दोन कोटी ३६ लाख २३ हजार १५२ रुपये खर्चाचा प्रस्ताव या कंपनीने पालिकेला दिला आहे. 

 

Web Title: Oxygen production project to be set up by Pune Municipal Corporation in the premises of Dalvi Hospital: Demand of BJP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.